महिला, तरुणींचा शारीरिक, मानसिक, लैंगिक छळ, कौटुंबिक छळ, अॅसिड अटॅक किंवा सायबर क्राइममधील पीडित अशा कोणत्याही अत्याचाराला बळी पडलेल्या महिलांना पोलीस, वकील, समुपदेशक अशा अनेकांची मदत घ्यावी लागते. मात्र, अत्याचाराचा सामना करावा लागल्यानंतर अशा व्यक्तींकडे जाऊन कोणत्याही प्रकारची मदत घेण्याची मानसिकता तिची उरलेली नसते. अशा महिलांना या योजनेंतर्गत एकाच छताखाली मोफत वैद्यकीय सुविधा, पोलीस मदतकेंद्र, समुपदेशन केंद्र, कायदेशीर मदत अशा सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. याबरोबरच पीडितेच्या गरजेनुसार तात्पुरत्या निवाऱ्याची सुविधादेखील या सेंटरमध्ये ती उपलब्ध करून दिली जात आहे.
नाशिकच्या सेंटरमध्ये घरगुती हिंसाचाराला बळी पडलेल्या ९४३ महिलांच्या तक्रारी दाखल झाल्या. अशा तक्रारींमध्ये या महिलांचे समुपदेशन करण्यात आले व त्यापैकी १६२ महिला पुन्हा संसाराला लागल्या आहेत. त्याच बरोबर १६८ महिलांना तात्पुरता निवाराही या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आला आहे. बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यात पोलिसात तक्रार घेत नसल्याने थेट सखी सेंटरमध्ये आलेल्या दोन महिलांना कायदेशीर मदत मिळवून देण्यात आली तर लैंगिक छळाला बळी पडलेल्या तिघा महिलांना आधार देण्यात आला आहे.
..अशी केली जातात कामे
* या सेंटरकडे तक्रार घेऊन येणाऱ्या महिलेच्या अगोदर तक्रारीचे स्वरूप जाणून घेतले जाते व त्यानंतर तिला हवी असलेल्या मदतीबाबत कार्यवाही सुरू होते.
* लैंगिक अत्याचाराला तक्रारदार बळी पडलेली असल्यास तिला कायदेशीर मदत मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन केले जाते.
* घरगुती कौटुंबिक हिंसाचारास बळी पडलेल्या महिलेचे समुपदेशन करण्यासाठी कौन्सिलिंग केले जाते.
* वन स्टॉप सेंटरमध्ये चोवीस तास सेवा पुरवली जात आहे. यासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
* पोलीस मदत, कायदेशीर मदतीसाठी तज्ज्ञ वकिलांची नेमणूक त्याच बरोबर आरोग्यविषयक उपचाराचीदेखील याठिकाणी सोय करण्यात आली आहे.
-------------------
घरगुती हिंसाचाराच्या तक्रारी सर्वाधिक
* सखी वन स्टॉप सेंटरमध्ये प्रामुख्याने महिलांच्या घरगुती शारीरिक व मानसिक हिंसाचाराच्या घटना अधिक घडल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्यात हुंड्यासाठी छळ, चारित्र्याच्या संशयावरून होणारी मारहाणीचे प्रकार अधिक आहेत.
* घरात किरकोळ कारणावरून होणाऱ्या वादामुळे रागारागात घर सोडून बाहेर पडलेल्या महिलांचीही संख्या अधिक आहे. अशा महिलांना तात्पुरता निवारा उपलब्ध करून देऊन त्यांचे समुपदेशन करून पुन्हा घरी पाठविण्यात आले.
* बलात्काराच्या प्रकरणात पोलीस तक्रारी घेत नसल्याच्या दोन प्रकारांमध्ये सखी सेंटरच्या प्रयत्नाने गुन्हा दाखल करण्यास भाग पाडण्यात आले.