लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : श्री हाईट्स अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावरील पाचव्या क्रमांकाच्या फ्लॅटची विक्री केल्यानंतर त्याची खरेदी न देता तिसऱ्याच व्यक्तीला परस्पर विक्री करून फ्लॅट खरेदीसाठी पैसे दिलेल्या फिर्यादीची फसवणूक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेंद्र आनंदराव पवार (६५, रा. मिडोज हॅप्पी, पाषाण बाणेर लिंकरोड पुणे) यांनी सरकारवाडा पोलिस ठाण्यात संशयित लोकेश राजदेव प्रसाद व राजदेव प्रसाद (रा. चिंचखेड, पिंपळगाव बसवंत) व गौरव अण्णासाहेब संत ( रा. अथर्व बंगला, अंबेनगर, पंचवटी) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संशयित प्रसाद यांनी पवार यांचा विश्वास संपादन करून त्यांना श्री हाईट्स अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावरील पाचव्या क्रमांकाच्या फ्लॅटची विक्री केल्यानंतर पैसेही स्वीकारले. मात्र, फ्लॅटची पवार यांना खरेदी न देता संबधित फ्लॅट परस्पर गौरव संत यास विक्री करून पवार यांची फसवणूक केली.
हा प्रकार लक्षात आल्यानंतर पवार यांनी सरकारवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी या प्रकरणानंतर तिन्ही संशयितांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पोलिस उपनिरीक्षक पाटील अधिक तपास करीत आहेत.