पुणेगावच्या ग्रामस्थांनी निवेदनात म्हटले आहे, मार्चपासून लॉकडाऊन झाल्याने आदिवासी शेत मजुरांच्या हाताला काम नाही. त्यामुळे मजुरांवर उपासमारीची वेळ आली होती. मोलमजुरी करणाऱ्या लाभार्थ्यांना दोन महिने स्वस्त धान्य दुकानातून मोफत धान्य देण्याचा शासनाने निर्णय घेतला होता. त्यानुसार पुरवठा विभागाने प्रत्येक स्वस्त धान्य दुकानदारांकडे मोफत धान्य पाठवले होते. मात्र तालुक्यातील पुणेगाव येथील स्वस्त धान्य दुकानदाराने मोफत धान्य वाटप करण्याऐवजी आदिवासी लाभार्थ्यांना सवलतीच्या दरात धान्य विक्री केले. मोफत धान्य वाटप करण्याचे शासनाचे आदेश असल्याचे आदिवासी लाभार्थ्यांना माहिती होताच त्यांना आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले. आदिवासी लाभार्थ्यांच्या हक्कावर स्वस्त धान्य विक्रेत्याने गदा आणून शासनाची दिशाभूल आणि आदिवासी जनतेची फसवणूक केल्याचे तक्रारीवरून प्रथमदर्शनी दिसून येत असल्यामुळे या धान्य दुकानदाराचा परवाना रद्द करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
कळवण तालुक्यातील एकूणच धान्य वितरण प्रणालीची चौकशी करण्याची मागणी आदिवासी जनतेने केली आहे.
इन्फो
कारवाईचे संकेत
कळवण तालुक्यातील पुणेगाव येथील एकूण ९२० लाभार्थ्यांच्या कुटुंबासाठी मे २०२१ या महिन्यासाठी तांदूळ ८.९० क्विंटल व गहू १३.७० क्विंटल तर अंत्योदय कुटुंबासाठी तांदूळ ६.५० क्विंटल व गहू ९.७० क्विंटल मोफत वाटप करण्यासाठी स्वस्त धान्य दुकानात आले होते. ११४ कुटुंबातील लाभार्थ्यांनाच २५ मे रोजी मोफतचे धान्य विकत दिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तहसीलदारांनी या प्रकाराची चौकशी करून कारवाईचे संकेत दिले आहेत.