पंचवटी : कोरोना महामारीच्या काळात अनेक मदतीचे हात पुढे येत आहेत. एकीकडे कोणी रुग्णांना मोफत जेवण तर, कोणी ऑक्सिजन सिलिंडर पुरविण्याचे काम करीत असताना दुसरीकडे मात्र काही समाजकंटकांकडून या कोरोना संकटाचा गैरफायदा घेत कोरोना रुग्णांना लागणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शन ज्यादा दराने विक्री करून काळाबाजार केला जात असल्याचा प्रकार वारंवार समोर येत आहे. आडगाव शिवारात अशाचप्रकारे ५४ हजार रुपयांना दोन इंजेक्शन विक्री करणाऱ्या दोन नर्ससह चौघांच्या टोळीचा अन्न व औषध प्रशासन विभागासह आडगाव पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी संशयिकांकडून दोन इंजेक्शन जप्त केले असून, चौघांनाही ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे यात ३ महिला नर्स व मेडिकल दुकानात काम करणाऱ्या एका युवकाचा समावेश आहे.
अन्न व औषध प्रशासन विभागासह आडगाव पोलिसांनी गुरुवारी (दि. १३) रात्री पावणेअकरा वाजता कारवाई करीत चारही संशयितांना ताब्यात घेत त्यांच्याकडून दोन इंजेक्शन ताब्यात घेतले. शहरात कोरोनाबाधित रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन आवश्यक असल्याने नातेवाइकांची इंजेक्शन मिळवण्यासाठी दमछाक होते. दुसरीकडे शहरातील समाजकंटकांकडून जादा दराने इंजेक्शन विक्री करून काळाबाजार केला जात आहे. कोरोना रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन पाहिजे असल्यास एका हॉस्पिटलला काम करणाऱ्या महिला नर्स सिडकोतील मेडिकल दुकानात काम करणाऱ्या युवकाच्या मध्यस्थीने विक्री करत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख यांना मिळाली होती. त्यांनी अन्न व औषध प्रशासनाला ही माहिती दिली. त्यानंतर इंजेक्शन खरेदीसाठी कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालयासमोर अन्न व औषध प्रशासनाचे सुरेश देशमुख, पोलीस उपनिरीक्षक चांदणी पाटील, नरवाडे, दशरथ पागी, विजय सूर्यवंशी, मोना भुसे आदींनी सापळा रचून बनावट ग्राहक पाठविले. त्यावेळी संशयित जागृती शरद शार्दुल, श्रुती रत्नाकर उबाळे या दोघी रेमडेसिविर इंजेक्शन विक्री करताना रंगेहाथ आढळून आल्या.
पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी
स्नेहल पगारे व कामेश बच्छाव हे इंजेक्शन उपलब्ध करून देत असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी चौघांनाही ताब्यात घेत चौकशी सुरू केली असून, गुन्हा दाखल करणार असल्याचे पोलीस निरीक्षक इरफान शेख यांनी सांगितले. दरम्यान, ताब्यात घेतलेल्या नर्स दिंडोरी, येवला, मनमाडच्या राहणाऱ्या असून, सध्या आडगाव शिवारात वास्तव्यास आहेत, तर मेडिकल दुकानात काम करणारा युवक सिडकोतील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले.