नाशिक : महापालिकेकडे नोंदविलेल्या सुमारे ४५० हून अधिक महिला बचतगटांच्या उत्पादनांच्या ब्रॅण्डिंग व पॅकेजिंगवर भर दिला जाणार असून, उत्पादनांच्या वितरणासाठी विक्री केंद्र साकारण्याचा विचार सुरू असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जीवनकुमार सोनवणे यांनी दिली.महापालिकेमार्फत सुमारे ४५० हून अधिक महिला बचतगटांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात. पालिकेकडे ४५० हून अधिक बचतगटांनी नोंदणी केलेली असली तरी सद्यस्थितीत सुमारे १५० बचतगटच कार्यरत असल्याचे समोर आले आहे. बचतगटांच्या उत्पादनांना प्रामुख्याने बाजारपेठ उपलब्ध होणे मोठे आव्हानात्मक काम आहे. या उत्पादनांचे ब्रॅण्डिंग होत नसल्याने मालाचा पाहिजे तसा उठाव होत नाही. वितरण व्यवस्थेत बचतगटाची उत्पादने कमी पडतात. त्यामुळेच महापालिकेकडे नोंदणीकृत असलेल्या महिला बचतगटांच्या उत्पादनांना ब्रॅण्डनेम देऊन त्यांना बाजारपेठेत उतरविण्याचा विचार केला जात आहे. बचतगटांच्या उत्पादनांचा दर्जा चांगला असला तरी बऱ्याचदा पॅकेजिंगमुळेही उत्पादनाला उठाव मिळत नाही. सध्याचा जमाना पॅकेजिंगचा असल्याने याबाबतही काय करता येईल, त्यादृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. बचतगटांना एकत्रित आणून उत्पादनाच्या दर्जा व वृद्धीबाबत मार्गदर्शन केले जाईल. बचतगटांच्या उत्पादनांना एका छताखाली आणण्यासाठी खास विक्री केंद्र सुरू करण्याचाही विचार असल्याचे जीवनकुमार सोनवणे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
बचतगटांच्या उत्पादनांसाठी साकारणार विक्री केंद्र
By admin | Published: October 19, 2015 11:25 PM