नाशिक : आरोग्यवर्धक असलेल्या ब्लॅक राईस बियाण्यांची विक्री सुरू करण्यात आली असून, कमी वेळेत प्रचंड उत्पादन देणाऱ्या या बियाण्याच्या लागवडीपासून तर काढणीपर्यंत ब्रम्हा ॲग्रो फार्मिंगच्यावतीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती राजाराम पानगव्हाणे यांनी दिली. साधारणपणे १०० ते ११० दिवसांत हा भात काढणीसाठी येतो व एकरी २४ ते ३० क्विंटलपर्यंतचे उत्पादन मिळते. देशात व परदेशात या भाताला मोठ्या प्रमाणात मागणी असून, नाशिक जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, इगतपुरी, नाशिक, कळवण, बागलाण या भागात मोठ्या प्रमाणावर तांदळाचे उत्पादन घेतले जाते. मात्र, गेल्यावर्षी पहिल्यांदाच बी. पी. टी. २८४१ ह्या ब्लॅक राईस प्रजातीचे बियाणे मिळाल्यावर जवळपास २५० क्विंटल बियाणे तयार झाले असून, बियाण्याची उगवण क्षमता चांगली असल्याने नाशिक जिल्ह्यासाठी एक नवीन वाण मिळालेले आहे. या वाणाची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांचे गट तयार करण्यात येणार असून, पिकवलेला भातसुद्धा या ग्रुपकडून खरेदी केला जाणार असल्याचेही राजाराम पानगव्हाणे यांनी सांगितले.
चौकट===
आजारांवर मिळते नियंत्रण
ब्लॅक राईस हा आरोग्यवर्धक असून, कॅन्सर, कोलेस्ट्रॉल, मधुमेह यासारख्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यास त्यामुळे मदत मिळते. तसेच त्यात इतरही ॲन्टिजन गुणसत्व आहेत. या भाताचे सेंद्रिय पद्धतीने पीक घेतल्यास देशात २५० ते ३०० रूपये किलोने विक्री होते तर परदेशात ७०० ते ९०० रूपये इतका दर मिळतो.