नाशिक : ‘मोगरा फुलला’, ‘उगीचंच काय भांडायचं’, ‘माझ्या मामाच्या लग्नाला यायचं हं’ आदी सुरेल गीतांच्या सादरीकरणाने नाशिककर रसिक मंत्रमुग्ध झाले. निमित्त होते, समर्थ बँकेच्या रौप्यमहोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देशस्थ ऋग्वेद मंगल कार्यालयात सोमवारी (दि.४) आयोजित सलील कुलकर्णी यांच्याशी मुक्त संवादाचे. यावेळी सलील कुलकर्णी यांनी विविध सुरेल गीतांसह त्यांच्या दिग्दर्शन, संगीत व गायन प्रवासातील विविध आठवणींना दिलखुलासपणे उजाळा देताना सादर केलेल्या विविध गाण्यांचा रसिकांनी आस्वाद घेतला.प्रारंभी पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांसह वायुसेनेचे स्क्वॉड्रन लीडर शहीद निनाद मांडवगणे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर सलील कुलकर्णी यांनी त्यांचा संगीत व चित्रपट प्रवास रसिकांसमोर उलगडून सांगताना ‘माझ्या वेडिंगचा सिनेमा काढा’, ‘मालवून टाक दीप’, ‘आता विसाव्याचे क्षण’, वेगवेगळ्या रचना सादर करताना रसिकांची मने जिंकली. प्रथमेश इनामदार यांनी सलील कुलकर्णी यांच्याशी मुक्त संवाद साधला. आदित्य आठल्ये यांनी साथसंगत केली. प्रास्ताविक मंदार तगारे यांनी केले. सचिन निरंतर यांनी आभार मानले. यावेळी व्यासपीठावर प्रशांत पुरंदरे, मुकुंद कुलकर्णी, प्रीतिश कुलकर्णी यांच्यासह नरेंद्र कुलकर्णी, प्रशांत जुन्नरे, सुहास पाटील, अरुण कुकडे, बाळासाहेब कुलकर्णी, अरुण भांड आदी रसिक उपस्थित होते.
सलील कुलकर्णी यांचे गायन रंगले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2019 12:50 AM