नाशिक - भारत माता की जय..वंदे मातरम... शहीद जवान तुझे सलाम... शहीद जवान अमर रहे... छत्रपती शिवाजी महाराज की जय... अशा घोषणा देत शुक्रवारी (दि. ५) पाथर्डी फाटा येथील शिवस्मारकापासून सकाळी साडे दहा वाजता कारगिल शौर्य वंदन यात्रेला प्रारंभ करण्यात आला.
कारगिल युद्धात राज्यातील २५ शहीदांच्या जन्मभूमीला नमन करण्यासाठी 'राष्ट्र प्रथम सोशल फाउंडेशन'च्या माध्यमातून विजय दिनाच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधत कारगिल शौर्य वंदन यात्रा आयोजित करण्यात आली आहे. ही यात्रा २५ शहीद सैनिकांच्या अंगणात पोहचणार आहे. या दरम्यान त्यांच्या अंगणाची मृदा संकलित करणे हा मुख्य उद्देश यात्रेचा आहे.
विशेष म्हणजे हा उपक्रम कारगिल युद्धात आपल्या पतीला गमविणाऱ्या नाशिकच्या विरपत्नी रेखा खैरनार व माजी सैनिक विजय कातोरे यांनी हाती घेतला आहे. राष्ट्र प्रथम सोशल फाउंडेशन व जय हिंद जनजागृती प्रतिष्ठान, विरपत्नी, वीरमाता बहुउद्देशीय संस्था यांच्या सौजन्याने या शौर्य वंदन यात्रा पार पडत आहे, अशी माहिती कातोरे यांनी दिली. २५ शहिदांच्या अंगणातील माती संकलित केल्यानंतर हे मृदा कलश मुंबईत २६ जुलै रोजी होणाऱ्या कारगिल विजय दिनाच्या कार्यक्रमात ठेवण्यात येणार आहे.
शुभारंभप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपस्थित विरपत्नी व माजी सैनिकांच्या पत्नींनी कातोरे यांचे औक्षण केले. तसेच शौर्य वंदन यात्रा रथाचेही पूजन केले. याप्रसंगी विजय कातोरे, विरपत्नी रेखा खैरनार, जयश्री पाटील, सुषमा मोरे, माजी सैनिक पत्नी सरला शिरसाठ, विजया पाटील, भाग्यश्री जाधव, जयश्री हिंगे, माजी सैनिक कॅप्टन किसन गांगुर्डे यशवंत देवरे, वसंत हिंगे, अनिल सोनवणे, खगेश जाधव आदी उपस्थित होते.
यात्रा या जिल्ह्यांतून जाणार
शौर्य वंदन यात्रा नाशिक, बीड, अहमदनगर, ठाणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, लातूर, रत्नागिरी, अमरावती, परभणी, सोलापूर या जिल्ह्यांतून प्रवास करणार आहे. सातारा जिल्ह्यातील पाच गावांचा यात्रेत समावेश आहे. मंगळवारी (दि. ९) ही यात्रा नाशिकमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे.