नाशिक : आपल्या धर्मातील अन्य सर्व देव आशीर्वाद देण्यासाठी तत्पर असतात. मात्र, युगानुयुगे भक्तांची प्रतीक्षा करीत विटेवर उभा असलेला आणि तो आपल्याला छातीशी कवटाळेल, असा समरसतेचा भाव निर्माण करणारा विठ्ठल हा एकमेव अवतार असल्याचे प्रतिपादन विद्यावाचस्पती विवेक घळसासी यांनी केले.ग्रामोदय शिक्षण संस्था आणि हिरे परिवाराच्या वतीने थोरात सभागृहात आयोजित स्व. रामराव तथा पोपटराव हिरे स्मृती व्याख्यानमालेत ते समरसतेचा मार्ग वारकरी संप्रदाय या विषयावर बोलत होते. सर्व तीर्थक्षेत्रांना जाताना आपल्या मनात भक्तिभाव असतो, पण विठुमाउलीच्या दर्शनावेळी आपल्या मनात भक्तिभावाच्याही पल्याडचं काही असते. सर्वांना समान पातळीवर आणणाऱ्या या समरसतावादी देवामुळे वारकरी संप्रदायातदेखील कमालीची समरसता दिसून येत असल्याचे घळसासी यांनी यावेळी व्याख्यानात नमूद केले.संत हे ईश्वराच्या चैतन्याचे प्रकटीकरण असून, वारकरी संप्रदायामुळेच महाराष्टÑातील अठरा पगड जाती-जमातीतून संत निर्माण झाले. प्रत्येक संतांनी त्यांच्या तत्त्वज्ञानात सारे जीव एकसमान असल्याचाच संदेश दिला आहे. तरीदेखील आपण संतांनादेखील जातीपातीत विभागण्याचे महापाप करीत असल्याचे घळसासी यांनी नमूद केले.
समरसता भाव निर्माण करणारा विठ्ठल : विवेक घळसासी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 12:40 AM