नाशिक : आपल्या शेतातील आंबे खाल्याने मुलेच होत असल्याचे वादग्रस्त वक्तव्य करण्याच्या प्रकरणात हिंदुत्वावादी संघटना शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी ऊर्फ मनोहर भिडे गुरुजी यांना नाशिक येथील कनिष्ठ न्यायालयाने शुक्रवारी (दि.७) जामीन मंजूर केला. पंधरा हजार रुपयांच्या वैयक्तीक जातमुचलक्यासह न्यायालयाच्या आदेशानुसार हजर राहण्याच्या अटीवर हा जामीन मंजूर करण्यात आल्याचे भिडे गुरुजींचे वकील अॅड. अविनाश भिडे यांनी सांगितले.दरम्यान, या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या शुक्रवारी(दि. १४) होणार आहे. नाशिक महापालिकेने केलेल्या याचिकेतील कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध सत्र न्यायालयात दाखल केलेली पुनर्विचार याचिका फेटाळण्यात आल्याने तर शुक्रवारी भिडे गुरुजी नाशिकमधील न्यायालयात हजर झाले होते. यावेळी सरकारी वकील अॅड. रेशमा जाधव यांनी भिडे गुरुजी यांचे वक्तव्य गंभीर स्वरुपाचे असून गर्भलिंग निदान कायद्याचे उल्लंघन करणारे व अंधश्रद्धा पसरविणारे आणि बेटी बचाव बेटी पढाव अभियानाला धक्का पोहोचविणारे असल्याचा युक्तीवाद करतानाच त्याचा समाजात गंभीर परिणाम होण्याची भिती व्यक्त करीत भिडे गुरुजींचा जामीन अर्ज फेटाळण्याची विनंत न्यायालयाला केली. परंतु, भिडे गुरुजींच्या वक्तव्याच्या चुकीचा अर्थ काढल्या गेल्याचा दावा करीत प्रथम दर्शनी अशाप्रकारचा कुठलाही गुन्हा घडल्याचे स्पष्ट होत नसल्याचा दावा करीत बचाव पक्षाचे वकील अॅड. अविनाश भिडे यांनी भिडे गुरुजी यांना जामीन मिळण्याची विनंती न्यायालयाला केली. तसेच भिडे गुरुजी यांची प्रकृती उतार वयामुळे अस्वस्थ्य राहत असल्यामुळे त्यांना न्यायालयात हजर राहण्यापासून सवलत मिळवी अशीही विनंती न्यायालयाला केली. परंतु, न्यायमूर्ती जगदीश पांडे यांच्या न्यायालयाने भिडे गुरुजींना पंधरा हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला. मात्र, न्यायालयात हजर राहण्यापासून सवलत मिळण्याच्या विनंतीवर न्यायाललयाने निर्णय राखून ठेवला. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार यापुढील सुनावणीला भिडे गुरुजींना हजर राहावे लागणार आहे. दरम्यान, शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी न्यायालयाच्या आवारात मोठ्या प्रमाणात गर्दी के ल्याने पोलीसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
काय आहे आंबा प्रकरण?नाशिकमधील १० जून २०१८ रोजी झालेल्या सभेत माझ्या शेतातील आंबे खाल्ल्याने मुलगाच होतो, असे वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे यांनी केले होते़ याबाबत ‘लेक लाडकी अभियान’तर्फे आरोग्य विभागाच्या अतिरिक्त संचालकाकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी नाशिक महापालिकेच्या आरोग्य विभागास अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आरोग्य विभागाने नेमलेल्या चौकशी समितीस तथ्य आढळून आल्याने त्यांनी संभाजी भिडे यांना नोटीस बजावून चौकशीस हजर राहण्यास सांगितले़ मात्र, भिडे गुरुजींकडून नोटीस स्वीकारण्यात आली नसल्याने व चे चौकशीलाही उपस्थित न राहिल्याने महापालिकेने नाशिकच्या जिल्हा न्यायालयात भिडे गुरुजींविरोधात खटला दाखल केलेला आहे.