नाशिक - वादग्रस्त विधानप्रकरणी गुन्हा दाखल झालेले शिवप्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांना आज नाशिकमधील न्यायालयाने जामीन मंजूर केला. पंधरा हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर संभाजी भिडे यांना जामीन मंजूर करण्यात आला. याआधी खटला दाखल होऊन समन्स बजावल्यानंतरही संभाजी भिडे यापूर्वी तीन वेळा न्यायालयासमोर हजर राहू शकले नव्हते.
शिवप्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांनी दहा जून रोजी नाशिक येथे आयोजित सभेत " माझ्या शेतातील आंबे खाल्ल्याने मुले जन्माला येतात " असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या व वादग्रस्त विधानाविरोधात पुणे येथील आरोग्य विभागाचे अतिरिक्त संचालकांकडे 'लेक लाडकी अभियान ' या संस्थेने तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत नाशिक महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने चौकशी करून भिडेंच्या विरोधात जिल्हा न्यायालयामध्ये दावा दाखल केला होता. दावा दाखल होऊन समन्स बजावूनही भिडेगुरुजी यापूर्वी तीन वेळा न्यायालयासमोर हजर राहू शकले नव्हते. आज मात्र ते मा. न्यायालयापुढे हजर झाले. त्यानंतर न्यायालयाने पंधरा हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर त्यांची मुक्तता केली.
यावेळी संभाजी भिडे यांच्या समर्थकांनी न्यायालयाच्या आवारात मोठी गर्दी केली होती, त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, तसेच पोलीस प्रशासनाने देखील या ठिकाणी आपला बंदोबस्त तैनात केला होता.