राधाकृष्ण विखे-पाटील हे मुंबईहून निघाल्यानंतर बुधवारी (दि.२६) अचानक नाशिकमध्ये एका हॉटेलमध्ये उतरले आणि त्यांनी केवळ मराठा आरक्षण याच विषयावर पत्रकारांशी बाेलताना सर्व संघटनांनी एकत्र येऊन सामूहिक नेतृत्व करण्याचे आवाहन केले. मराठा आरक्षणाबाबत विद्यमान राज्य सरकारवर ठपका ठेवताना त्यांनी काँग्रेसची अवस्था दयनीय होत चालल्याने त्यांनी आत्मचिंतन करावे, असा सल्लाही दिला. दोन दिवस नाशिक दौऱ्याचेदेखील त्यांनी नियोजन केले आहे. विखे-पाटील यांच्या बुधवारी झालेल्या नाशिक भेटीविषयी भाजपचे नेते अनभिज्ञ हेाते.
दरम्यान, एकीकडे विखे-पाटील नाशिकमध्ये असताना दुसरीकडे खासदार संभाजीराजे यांनी वाडीवऱ्हे येथे दिवसभर मराठा संघटना प्रतिनिधींची मते जाणून घेतली. मुख्यमंत्र्यांच्या भेटी आधी त्यांनी सर्वांची मते जाणून घेतल्याचे समजते. निर्णयाप्रत पोहचण्यावर भर असल्याचे त्यांनी सांगितल्याचे समजते.
इन्फो..
नाशिक बनले घडामोडीचे केंद्र
मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत नाशिक हे घडामाेडींचे केंद्र बनले आहे. आरक्षणाच्या आंदोलनासाठी आता नाशिकमध्ये रणशिंग फुंकले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.