रशीद सैय्यद / मालेगाव मध्य : मालेगाव उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात दोन वाहनांची नोंदणी होऊन त्यांना एकच क्रमांक दिल्याचे तब्बल ११ वर्षानंतर समोर आले आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असला आहे. या कार्यालयीन चुकीचा आर्थिक फटका फक्त वाहनधारकांना सोसावा लागणार नसून मनस्ताप सहन करण्याची वेळ आली आहे. मालेगाव उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात शेख इमाम शेख गुलाब (रा. देवीचा मळा) यांनी ७ जानेवारी २०१० रोजी आपल्या स्विफ्ट डिझायरची रीतसर वाहन नोंदणी करून एमएच ४१ सी ६५६५ वाहन क्रमांक घेतला. तीन वर्षांनंतर त्यांनी वाहन विक्री करीत माधव बालकिसन सानप ((रा. लासलगाव, जि. नाशिक) यांच्या नावाने नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे ना हरकत प्रमाणपत्र (एन.ओ.सी.) देण्यात आले असल्याची नोंद मालेगाव उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या दप्तरी आहे. त्यानंतर राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन विभाग संगणकीकृत झाले; परंतु याच कार्यालयाच्या संगणकावर २७ जुलै २०१० रोजी म्हणजे शेख यांच्या वाहन नोंदणीच्या सहा महिन्यांत प्रसाद एन.जोशी यांच्या नावाने टोयोटा फॉरच्युनर वाहनाची नोंदणी होऊन या वाहनासही एमएच ४१ सी ६५६५ हा क्रमांक दिला असल्याचे दिसत आहे. त्यामुळे दप्तरावर शेख यांची स्विफ्ट डिझायर व संगणकावर फॉरच्युनर पाहावयास मिळत आहे. त्यामुळे वाहनमालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, खरा क्रमांक कोणत्या वाहनाचा, असा प्रश्न विचारला जात आहे.
-----------------
राज्यातील सर्व वाहनांची माहिती संगणकीकृत झाली आहे. त्यामुळे राज्यातील सर्वच वाहतूक पोलिसांना एका क्लिकवर वाहनाची उपलब्ध होते. मात्र सदर प्रकरणात ऑनलाईन फॉरच्युनरची माहिती दर्शवीत असल्याने स्विफ्ट डिझायरच्या मालकास कदापि बनावट वाहन क्रमांक वाहनावर लावल्याप्रकरणी पोलिसी कारवाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येणार नाही.