नाशिक : ‘संपूर्णम’ या सामाजिक उपक्रमाची सध्या नाशिकमध्ये चर्चा होत आहे. भंगलेल्या मूर्ती आणि प्रतिमांचे पावित्र्य कसे राखावे असा अनेकांना प्रश्न पडतो. त्याचे उत्तर ’संपूर्णम’या उपक्रमाच्या माध्यमातून नाशिकरांना मिळाले आहे. अशा मूर्ती आणि प्रतिमांचे पावित्र्य राखले जाईलच शिवाय पर्यावरणाचेही रक्षण होऊ शकेल या कल्पनेतून लायन्स क्लबने शहरात दोन ठिकाणी संकलन केंद्रे सुरू केली आहेत.
धार्मिक भावना आणि धर्माचे पावित्र्य राखले जावे असा सामाजिक संकेत आहेत. प्रत्येकाच्या धार्मिक भावनेचा आदर करण्याची शिकवण आपणाला मिळालेली असल्याने या भावनेच्या मुद्द्यावर अनेक व्यक्ती आणि संस्था मानवतेचा धर्म निभावण्यासाठी पुढे सरसावत असतात. अशाच भावनेतून लायन्स क्लब ऑफ नाशिक स्टार आणि लायन्स क्लब ऑफ नाशिक मेन या संस्थांनी संपूर्णम हा उपक्रम आरंभला आहे. या उपक्रमांतर्गत शहरातील पंडित कॉलनी आणि सिटी सेंटर मॉल समोरील चौकाजवळ म्हसोबा मंदिर असे दोन रॅक उभारण्यात आलेल्या आहेत. देव-देवतांच्या भंगलेल्या मूर्ती आणि प्रतिमा या ठिकाणी ठेवण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. धार्मिक पुस्तके, निर्माल्य मात्र स्वीकारले जात नाही.
भावनेचा मुद्दा असल्यामुळे अनेक लोक अशाप्रकारच्या मूर्ती आणि प्रतिमा नदीत विसर्जन करतात, कुणी झाडाजवळ, पुलावर ठेवतात. त्यामुळे त्यांचे पावित्र्यदेखील धोक्यात येऊ शकते. नदीचेही प्रदूषण होते. हे सर्व टाळण्यासाठी ‘लायन्स’ने पुढाकार घेऊन संकलनाचा हा उपक्रम हाती घेतला आहे. येथे जमा झालेल्या मूर्ती, प्रतिमांचे महापालिकेच्या सहकार्याने विधिवत एका ठिकाणी विसर्जन केले जाते.
मंत्रभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिककला पौराणिक,धार्मिक आणि अध्यात्मिक परंपरा लाभली आहे. त्यामुळे धार्मिक भावनेलाही तितकेच महत्त्व आहे. त्यामुळेच नाशिकरांसाठी हा उपक्रम ‘संपूर्णम’असाच ठरला आहे
--कोट--
‘लायन्स’ने मागीलवर्षी तृप्ती गायकवाड यांच्या संकल्पनेतून एका दिवसासाठी हा उपक्रम राबविला होता. नागरिकांचा लायन्सवर विश्वास असल्याने नाशिककरांकडून या उपक्रमाची मागणी होऊ लागली. आता या उपक्रमाला मूर्त स्वरूप देण्यात आले आहे. धार्मिक भावनेचा मुद्दा असल्याने महापालिकेला सोबत घेऊन उपक्रम सुरू करण्यात आला. शहरात आणखी इतर ठिकाणी देखील हा उपक्रम सुरू करण्याचा मानस आहे.
- डॉ. नुपुरा प्रभू, अध्यक्ष, नाशिक लायन्स.
(फोटो, प्रशांत खरोटे)