कळवण : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने लोकप्रतिनिधी, तालुका प्रशासन, सर्वपक्षीय कृती समिती व्यापारी महासंघ यांनी संयुक्तरीत्या गुरुवारपासून (दि.१४) चार दिवस लागू केलेल्या जनता कर्फ्यूच्या पहिल्या दिवशी कळवण शहरासह तालुक्यातील अभोणा, कनाशी, नवी बेज, दळवट, जयदर, देसराणे, मोकभणगी आदी मंडळातील प्रत्येक गावाने कडकडीत बंद पाळला. मेडिकल व वैद्यकीय ही अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यापारी व व्यावसायिक बांधवांनी शंभर टक्के बंद ठेवून जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.कळवण शहरात ११ वर्षाचा पहिला रुग्ण कोरोनाबाधित आढळून आल्यामुळे शहर व तालुक्यातील जनता चांगलीच हादरली आहे शिवाय तालुक्याला लागून असलेल्या मालेगाव तालुक्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे ही वाढ धोक्याची घंटा मानली जात आहे. मालेगावात दिवसेंदिवस कोरोना रु ग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे प्रशासनासह जनतादेखील हादरली आहे. त्यामुळे आमदार नितीन पवार, सर्वपक्षीय कृती समिती व्यापारी महासंघ व तालुका प्रशासनाने प्रायोगिक तत्त्वावर ४ दिवस जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेतला. कळवण शहरातील मुख्य बाजारपेठ असलेला मेनरोड, सुभाष पेठ, शिवाजीनगर, गणेशनगर, बसस्थानक, जुना ओतूर रोड, गांधी चौक, अंबिका चौक, फुलाबाई चौक, नेहरू चौक, ओतूररोड, परिसरात नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने रस्ते बंद केले. जनत कर्फ्यूमध्ये मेडिकल व हॉस्पिटल वगळून बाकी सर्व सेवा बंद असून, शहरहितासाठी जनता कर्फ्यूचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन आमदार नितीन पवार, सर्वपक्षीय कृती समितीचे शेतकरी संघटनेचे नेते देवीदास पवार, शिवसेनेचे कारभारी आहेर अंबादास जाधव, साहेबराव पगार, राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र भामरे, जितेंद्र पगार, काँग्रेसचे महेंद्र हिरे, अतुल पगार, भाजपाचे दीपक खैरनार, निंबा पगार मनसेचे शशिकांत पाटील डॉ. दीपक शेवाळे, छावाचे प्रदीप पगार, किशोर पवार, व्यापारी महासंघाचे मोहनलाल संचेती, जयंत देवघरे, विलास शिरोरे, नितीन वालखडे, सागर खैरनार, संदीप पगार, दीपक महाजन आदींनी केलेआहे.----------------------------------------------रस्ते लॉकडाउनसुरक्षेचा उपाय म्हणून कळवण शहर व तालुक्यातील गल्ली-बोळांसह प्रमुख रस्ते लॉकडाउन केले आहे. ठिकठिकाणी लाकडी बांबू, बल्ल्या, झाडे-झुडपे, बॅरिकेड्स, हातगाड्या, पलंग आदींच्या साहाय्याने नागरिकांनी रस्ते लॉकडाउन केले आहे.पोलीस अॅक्शन मोडवरकोरोना संसर्गित रु ग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी जनता कर्फ्यूचे पालन केले नाही तर कारवाईचा इशारा दिल्याने शहरात पोलीस अॅक्शन मोडवर दिसून आले. विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्यांना फटकावणे सुरू केले. त्यामुळे बाजारपेठा, रस्ते, निर्मनुष्य झाली होती.