सातपूर : महानगरपालिकेच्या निवडणुकीला आजपासून खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असली तरी आज एकही उमेदवार निवडणूक कार्यालयाकडे फिरकला नाही. त्यामुळे आजचा दिवस निरंक राहिला.महानगरपालिकेच्या सहाव्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शुक्रवारपासून (दि. २७) उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरु वात झाली आहे. सातपूर विभागात ८ ते ११ अशा चार प्रभागांसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याकरिता व्यवस्था करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अहमदनगर महापालिकेतील उपआयुक्त भालचंद्र बेहरे, सहायक अधिकारी म्हणून तहसीलदार बबन काकडे काम पहात आहेत. शुक्रवारपासून (दि.२७) उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार असल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी आवश्यक ती सर्व तयारी करून ठेवली आहे; मात्र पहिल्या दिवशी एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही.निवडणूक लढविताना उमेदवार कोणत्याही शासकीय करांचा थकबाकीदार नसावा. तसा ना हरकत दाखला उमेदवारी अर्जासोबत जोडणे बंधनकारक आहे, असा नियम असल्याने निवडणूक लढविणाऱ्या सर्व इच्छुक उमेदवारांनी आपल्या नावावरील थकबाकी भरून ना हरकत दाखला घेण्यास सुरुवात केली आहे. सातपूर विभागीय कार्यालयातून आतापर्यंत १,६२८ उमेदवारांनी ना हरकत दाखला घेतल्याची माहिती विभागीय अधिकारी राजेंद्र गोसावी यांनी दिली. (वार्ताहर)
सातपूरला सामसूम, दाखल्यांसाठीच गर्दी
By admin | Published: January 28, 2017 1:16 AM