नाशिक : नायलॉन मांजाने संक्रांतीच्या दिवशी गिधाडासारख्या दुर्मीळ पक्ष्याचा बळी घेतल्याची घटना सातपूर कॉलनीमध्ये रविवारी (दि.१४) घडली. एकूणच नायलॉन मांजामुळे पक्ष्यांवर संक्रांत ओढावली आहे. गिधाडासारखा दुर्मीळ पक्षी मात्र ताकदवान व जास्त वजनाचा असलेल्या या पक्ष्याचाही नायलॉन मांजाने घात केला.याबाबत वनविभाग व अग्निशामक दलाकडून मिळालेली माहिती अशी, सातपूर कॉलनीमधील रहिवासी असलेले प्रकाश मधुकर सांबरे यांच्या घराच्या गच्चीवर मृतावस्थेत गिधाड पडल्याचे रविवारी आढळून आले. सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास सदर प्रकार निदर्शनास आल्यानंतर तत्काळ त्यांनी अगिशामक दलाला माहिती दिली. सातपूर उपकेंद्राचा बंब व जवान घटनास्थळी पोहचले; मात्र गिधाड मृतावस्थेत असल्यामुळे त्यांनी ते ताब्यात घेतले नाही, नायलॉन मांजामुळे मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशामक दलाने वर्तविला. त्यानंतर घराच्या गच्चीवरून संबंधितांनी ते गिधाड उचलून परिसरातील नाल्याजवळ टाकून दिले. सदर बाब ही संध्याकाळी उशिरा नाशिक वनविभागाच्या पश्चिम कार्यालयातील अधिकाºयांना समजली. त्यानंतर वनपरिमंडळ अधिकारी रवींद्र सोनार, वनरक्षक सचिन अहेर आदींनी घटनास्थळी धाव घेतली असता सांबरे यांचे घर कुलूपबंद असल्याचे आढळले. त्यानंतर नासर्डी नदीच्या पात्राच्या परिसरात मृत गिधाडाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; मात्र अंधारामुळे मृतदेह मिळून आला नाही. सकाळी पुन्हा शोधमोहीम वनविभागाच्या माध्यमातून राबविली जाणार असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत खैरनार यांनी सांगितले. याबाबत वनविभागाच्या पश्चिम कार्यालयाने दखल घेतली असून, सकाळी जितक्या लवकर शक्य होईल, तितक्या लवकर परिसरात शोधमोहीम सांबरे यांच्या मदतीने राबविली जाणार आहे.वनविभागाकडून नायलॉन मांजाविरोधी मोहीमगिधाड हे वन्यजीव नामशेष होण्याच्या मार्गावर असून, नाशिक जिल्ह्यात मात्र गिधाडांचे अस्तित्व अद्यापही टिकून आहे, हे शुभवर्तमान मानले जात आहे. गिधाड संरक्षण व संवर्धनासाठी वनविभागाकडून प्रयत्न सुरू असताना अगदी शहरी भागात गिधाडाचा अशाप्रकारे एका घराच्या छातावर कोसळून होणा-या मृत्यूची घटना दुर्दैवी व संतापजनक असल्याचे उपवनसंरक्षक टी. ब्यूलाएलिल मती यांनी सांगितले. नागरिकांनी संक्रांतीनिमित्त पतंगबाजीचा आनंद घ्यावा, मात्र नायलॉन मांजाचा त्यासाठी वापर क रू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. नायलॉन मांजाची विक्री व वापर होत असल्यास त्याची माहिती त्वरित वनविभागाच्या कार्यालयाला द्यावी, असेही आवाहन मती यांनी केले आहे. नायलॉन मांजाविरोधी जप्ती मोहीम वनविभागाने हाती घेतली असून, या मोहिमेचे स्वरूप व्यापक केले जाणार असून, याबाबत स्थानिक पोलीस ठाण्यांच्या मदतीने संयुक्तरीत्या छापे टाकले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.