सभापती स्वाती भामरे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या महिला व बालकल्याण समितीच्या बैठकीत शहरातील महिलांना बचतगट स्थापन करणे व त्यांना मनपाच्या वतीने प्रशिक्षण देण्यास मंजुरी देण्यात आली. त्यामध्ये पॅनकार्ड, फूड परवाना, सकस आहार याविषयी प्रशिक्षण देण्याचे ठरविण्यात आले. यासाठी महिलांचे अर्ज मागविण्यास मंजुरी देण्यात आली. मनपा समाज कल्याण विभागाच्या तसेच महिला बालकल्याण विभागाच्या सुरू असलेल्या ४ योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या सूचना देण्यात आल्या. नाशिक शहरातील महिलांना कौशल्य विकास अंतर्गत प्रशिक्षण देण्याच्या निविदेत त्रुटी असल्याने फेरनिविदा काढण्याच्या तसेच गरोदर महिलांना विनामूल्य औषधपुरवठा नियमित होईल याबाबत नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. अंगणवाडी सेविकांचा वैद्यकीय विमा काढण्याच्या दृष्टीने तयारी करण्याचे तसेच ज्या अंगणवाडी सेविका कोरोनाग्रस्त झाल्या होत्या त्यांना त्या कालावधीचे मानधन देण्याची व्यवस्था करण्याचे ठरविण्यात आले. शहरातील जॉगिंग ट्रॅक येथे महिलांसाठी ई-टॉयलेटची व्यवस्था करण्यावर चर्चा करण्यात आली. या बैठकीस उपसभापती मीरा हांडगे, सदस्य प्रतिभा पवार, सुप्रिया खोडे, माधुरी बोलकर, समिना मेमन, राधा बेंडकोळी, पूनम मोगरे, उपायुक्त अर्चना तांबे, नगरसचिव राजू कुटे आदी उपस्थित होते.
अंगणवाडी सेविकांच्या मानधनवाढीला मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2021 4:10 AM