खर्डेदिगर येथील वीज उपकेंद्रासाठी ३ कोटी ६३ लाख रुपये तर जिरवाडे (ह) येथील वीज उपकेंद्रासाठी ३ कोटी ७० लाख रुपयांची महावितरणने तांत्रिक व प्रशासकीय मान्यता दिल्यामुळे आता जिल्हा वार्षिक योजनेतून आदिवासी उपयोजनेंतर्गत निधी उपलब्ध होणार असल्याची माहिती आमदार नितीन पवार यांनी दिली आहे.
निधी उपलब्ध झाल्यानंतर लगेच कामाला प्रत्यक्षात सुरुवात होणार असल्यामुळे खर्डेदिगर व जिरवाडे (हं) परिसरातील ५० गाव, वाड्या वस्तीवरील शेतकऱ्यांना अखंडित व हक्काची वीज मिळणार आहे.
खर्डेदिगर व जिरवाडे (ह) परिसरात सध्या मुबलक प्रमाणात वीज पुरवठा होत नसल्याची ओरड होत आहे. वाढती विजेची मागणी, वीज गळती, वीजचोरीमुळे कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्यामुळे शेतीपंपाना सुरळीत वीज मिळत नसल्याची कैफियत या भागातील शेतकऱ्यांनी नितीन पवार यांच्या समोर मांडली होती. त्यानंतर या संदर्भात महावितरणकडे प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. त्यानुसार उपकेंद्राला मंजुरी मिळाली असून आदिवासी उपयोजनेतून निधी उपलब्ध झाल्यावर प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार आहे.