इगतपुरी : निसर्गसौंदर्याचा विकास साधून शहराची एक नवी ओळख निर्माण करण्याच्या हेतूने शहर आर्थिक, सामाजिक व नागरी विकासाने समृद्ध व्हावे या संकल्पनेतून नगराध्यक्ष संजय इंदुलकर यांनी उपनगराध्यक्ष नईम खान यांच्या पर्यटन विकास आराखड्याला नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेच्या ऐनवेळेच्या विषयावेळी बुधवारी (दि. २५) मंजुरी देत शहराचा सर्वांगीण विकास साधण्याकामी मुख्याधिकारी पंकज गोसावी यांनी ऑनलाइन सभेत सहभाग दर्शवित आढावा घेतला.
सभेदरम्यान खान या समितीचे अध्यक्ष घोषित करून नगरसेवक सदस्य व विरोधी पक्ष सदस्यासह अपक्ष सदस्यांची पाच सदस्य समिती तयार केली. शहर पर्यटनाबरोबर तालुका पर्यटन विकसित व्हावा यासाठी पंचायत समिती, जिल्हा परिषद सोबत वनविभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग, पर्यटन महामंडळ यांचा सहभाग घेऊन इगतपुरीचा विकास साधला जावा यात शहर व तालुक्यातील व्यापार, रोजगार, शिक्षण, आरोग्य तसेच विविध कलागुणांना वाव देत नागरिकांच्या सहभागातून हा संकल्प पूर्ण करणार असल्याचे मत खान यांनी सभेत मांडले.
पर्यटन विकास समितीत अध्यक्ष नईम खान, सदस्य विरोधी पक्षनेत्या साबेरा पवार, नगरसेविका मीनाताई खातळे, नगरसेवक गजानन कदम, अपक्ष नगरसेवक संपत डावखर यांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी नगरसेवक सुनील रोकडे, सीमा जाधव, गजानन कदम तर ऑनलाइन सभेत सर्व नगरसेवक नगरसेविकांसह नगरपरिषदेचे अभियंता प्रशांत जुन्नरे, पाणीपुरवठा विभागाचे अनिल चौधरी, वीज विभागाचे मोहन पवार, सभा अधीक्षिका मोनिका शेवाळे, संगणक विभागप्रमुख सुरेखा जोगदंड, बांधकाम विभागाचे यशवंत ताठे, अनंत कळमकर अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.
---
रस्त्यांच्या कामांबाबत सकारात्मकता
याप्रसंगी शहराचा मुख्य जुना मुंबई-नाशिक महामार्गाला पडलेले खड्डे बुजवून रस्ता तयार व्हावा म्हणून आमदार हिरामण खोसकर यांनी दीड कोटी रुपये निधी मंजूर केला असून, तो निधी नगरपरिषदेत वर्ग करून रस्त्याचे काम त्वरित सुरू करावे. याकरिता खोसकर व सार्वजनिक बांधकाम विभाग प्रमुखांशी इंदुलकर यांनी दूरध्वनीद्वारे चर्चा साधली असता संबंधितांनी सकारात्मकता दर्शविली. पर्यटन विकासासाठी खासगी संस्था व एजन्सीला यात समाविष्ट करून शहराचा चेहरामोहरा बदलून विकास केला जाईल यासाठी खासदार हेमंत गोडसे, आमदार हिरामण खोसकर व संबंधित अधिकाऱ्यांचा समावेश असेल.
इगतपुरी नगरपरिषदेत सर्वसाधारण सभेत मार्गदर्शन करताना नगराध्यक्ष संजय इंदुलकर, उपनगराध्यक्ष नईम खान, अधिकारी, कर्मचारी. (२५ इगतपुरी नगरपरिषद)
250821\25nsk_24_25082021_13.jpg
२५ इगतपुरी नगरपरिषद