नाशिक : आगामी काही दिवसांत पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्याने जिल्हा परिषदेच्या विकासकामांच्या मान्यता घेऊन ही कामे तत्काळ सुरू करावीत, असे आदेश बांधकाम व अर्थ समिती सभापती तथा उपाध्यक्ष प्रकाश वडजे यांनी दिले.बांधकाम समितीची मासिक बैठक उपाध्यक्ष प्रकाश वडजे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीत प्रत्येक विभागनिहाय कामांचा आढावा घेण्यात आला. त्यात आचारसंहिता तोंडावर असल्याने सर्वच विभागप्रमुखांनी त्यांच्या विभागाला प्राप्त झालेल्या निधीतून लवकरात लवकर कामांच्या निविदा करून विकासकामांचे कार्यारंभ आदेश देण्यात यावे, तसेच प्राप्त निधी शंभर टक्के खर्च करण्यात यावा, असे आदेश बांधकाम सभापती तथा उपाध्यक्ष प्रकाश वडजे यांनी बांधकाम विभागासह पाणीपुरवठा व लघुपाटबंधारे विभागाला दिले. नुकत्याच झालेल्या आॅगस्ट महिन्यातील अतिवृष्टीमुळे जिल्ह्णातील रस्ते व पुलांची हानी झाली असून, त्यांच्या दुरुस्तीसाठी सुमारे ७६ कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता असल्याने तसा प्रस्ताव शासनास सादर करण्यात येणार असल्याची माहिती बांधकाम विभागाच्या वतीने देण्यात आली. बैठकीस सदस्य अॅड. संदीप गुळवे, सोमनाथ फडोळ, सुरेश पवार, सुशीला मेंगाळ, ज्योती माळी, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, कार्यकारी अभियंता सिद्धार्थ तांबे, रवींद्र परदेशी, मिलन कांबळे, चंद्रशेखर वाघमारे, बापूसाहेब देसले, प्रकाश नंदनवरे आदि उपस्थित होते.(प्रतिनिधी)
आचारसंहितेपूर्वीच कामे मंजूर करावीत
By admin | Published: September 02, 2016 11:01 PM