नाशिक : अवैध वाळूची वाहतूक करतांना वारंवार तलाठ्याकडून कारवाई केली जात असल्याचा राग मनात धरून वाळू माफियांनी सोमवारी सकाळी कार्यालयात जाणार्या तलाठ्याला एकटे गाठून प्राणघातक हल्ला केला. लाकडी दांडके व लोखंडी टॉमीने केलेल्या बेदम मारहाणीत तलाठी यादव बच्छाव गंभीर जखमी झाले असून या घटनेने तलाठी कर्मचार्यामध्ये संतापाची लाट पसरली असून, या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नाशिक शहरात सर्रासपणे चोरीची वाळू आणली जात असून, मध्यरात्री अथवा पहाटेच्या सुमारास वाळू माफियांकडून राज्य व राष्ट्रीय महामार्गाचा त्यासाठी वापर केला जातो. एकट्या दुकट्या तलाठ्याने वाळू वाहतूकीवर कारवाई करण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्या अंगावर गाडी घालण्याचे प्रकारही यापुर्वी घडले आहेत. त्यामुळे वाळू माफियांची मुजोरी वाढली असून त्यातूनच सोमवारचा प्रकार घडला. गेल्या महिन्यात नाशिक तहसिलदार कार्यालयातील भरारी पथकाने नासर्डी पुलाजवळील शिवाजीवाडी येथून वाळू घेवून जाणारा मालट्रक संशयावरून अडविला असता, वडनेर दुमालाचे तलाठी यादव विठ्ठल बच्छाव (३५) यांनीच सदरचा मालट्रक अडवून त्याचा पंचनामा केला होता. सदर मालट्रकमध्ये वाळू होती त्याबाबतचे कोणतीही कागदपत्रे चालक व गाडी मालक सादर न करू शकल्याने सदरचा मालट्रक सील करून शिवाजीवाडी येथेच महसूल खात्याने उभा केलेला असून, तेव्हा पासूनच वाळू माफिया तलाठी यादव बच्छाव यांच्या मागावर होते. बच्छाव हे अशोका मार्गावर राहतात सोमवारी सकाळी आठ वाजता ते भाजीपाला घेण्यासाठी सह्याद्री हॉस्पिटल (जुने नागजी रूग्णालय)कडून दुचाकीवर जात असताना त्यांच्या पाठीमागून आलेल्या दोघांनी बच्छाव यांना अडविले व काही विचारपूस करण्यापुर्वीच मारहाण करण्यास सुरूवात केली. संबंधितांकडे लाकडी दांडुके व लोखंड गज असल्याचे पाहून बच्छाव जिवाच्या भितीने रस्त्त्याने पळत सुटले. परंतु हल्लेखोरांनी त्यांचा पाठलाग करून रस्त्यात गाठले व बेदम मारहाण केली. सकाळची वेळ असल्याने बच्छाव यांच्या मदतीला लवकर कोणी आले नाही, तो पर्यंत हल्लेखोरांनी त्यांना यथेच्छ मारहाण करून पलायन केले. या घटनेचे वृत्त कळताच तलाठी संघटनेच्या पदाधिकार्यानी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. बच्छाव यांना जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार केले जात आहे.
वाळू माफियांकडून तलाठ्यावर प्राणघातक हल्ला; नाशिक जिल्ह्यात लेखणी बंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2017 2:40 PM