लोहोणेर : महसूल विभागाच्या भरारी पथकाच्या वाहनाच्या पाठलागाने घाबरून वाळू तस्करांनी ट्रॅक्टर थेट उभ्या कांदा पिकांतून तुडवत नेल्याने शेतकऱ्याचे लाखो रूपयांचे नुकसान केले आहे. शेतात गेल्याने लाखो रूपयांचे कांदा पिकांचे नुकसान झाले आहे. वाळू तस्करीला आळा घालावा अशी मागणी गिरणा नदी काठावरील शेतकरी व लोहोणेर ग्रामस्थांनी केली आहे. लोहोणेर गावालगत गिरणा नदी पात्रात सर्रास मोठ्या प्रमाणावर वाळू तस्करी सुरू आहे.स्थानिक व बाहेरील वाळू तस्कर यांची मिलीजुळी असल्याचे बोलले जात असून त्यामुळे दिवसा बैलगाडी तर रात्री ट्रॅक्टरने बेसुमार वाळू उपसा होत आहे. बुधवारी रात्री महसूल विभागाच्या भरारी पथकाने वाळू तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरचा पाठलाग केल्याने सदर ट्रॅक्टर चालकाने चक्क लगतच्या कांदा उत्पादक शेतकरी निबा दगडू उशीरे यांच्या शेतातील तोड बटाईने शेती करत असलेले शेतकरी शिवाजी दगडू मेतकर हे कसत असलेल्या ( गट नंबर १०५३) मधील शेतातून सुमारे दीड महिन्यापूर्वी लागण झालेल्या उभ्या कांदा पिकांतून वाळूचे ट्रॅक्टर तुडवत नेऊन कांदा पिकांचे अक्षरशः नुकसान केले. सकाळी मेतकर यांचा मुलगा शेतात गेला असता त्याला हा प्रकार निदर्शनास आला.या संदर्भात तलाठी अंबादास पुरकर यांना प्रत्यक्ष घटनास्थळी बोलवून ही बाब निदर्शनास आणून दिली. त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करा असे सांगितले. याबाबत देवळा तहसीलदार दत्तात्रेय शेजुळ व देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांना निवेदन देण्यात आले आहे. वाळू तस्करी बाबत अटकाव घालण्यात यावा अशी मागणी लोहोणेर ग्रामस्थाच्यांवतीने करण्यात आली आहे.
------------------गेल्या दोन वर्षांपूर्वी कांदा पिकांतून तर मागच्या वर्षी सोयाबीन पिकांतून तर यावेळी पुन्हा कांदा पिकांतून वाळू तस्करांनी वाळूचे ट्रॅक्टर नेल्याने आपले मोठे आर्थिक नुकसान होत आहे. याबाबत तक्रार करून देखील वाळू तस्करांविरुद्ध कोणतीही कारवाई होत नाही.- विकास मेतकर, नुकसानग्रस्त शेतकरी, लोहोणेर