नाशिक : नाशिक-पुणे रोडवरील द्वारका परिसरातील इस्कॉनच्या श्रीराधा मदन गोपाल मंदिरात चंदन यात्रोत्सव आयोजित करण्यात आला होता. सुमारे तीन आठवडे चाललेल्या या उत्सवाचा समारोप रविवारी (दि.१७) करण्यात आला. या निमित्त भगवंताच्या मूर्तीची मनमोहक फुलांनी आकर्षक सजावट करून चंदनाचा लेप लावण्यात आला.अक्षयतृतीयापासून सुमारे एकवीस दिवस हा उत्सव साजरा करण्यात आला. या काळात सूर्याच्या उष्णतेत वाढ होऊन वातावरणात उन्हाची तीव्रता जाणवते. उन्हाच्या तीव्रतेपासून भगवंताला शीतलता मिळावी, या भावनेतून भक्तांकडून भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीवर चंदनाचा लेप लावण्यात येतो. या यात्रोत्सवादरम्यान रोज भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीची विविध प्रकारच्या रंगीबेरंगी फुलांनी आकर्षक सजावट करण्यात येत होती. तसेच चंदनाचे लेपन करण्यात आले.यासाठी पाच किलो चंदनाचा वापर करण्यात आला, अशी माहिती मंदिराचे अध्यक्ष कृष्णधन दास यांनी दिली. यावेळी गोपालानंद दास, माधव कृष्ण दास, मुकुंद दास, मारुती प्राण दास आदींसह भाविकांनी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करीत दर्शन घेतले. तसेच समाज माध्यमातूनदेखील भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.
इस्कॉन मंदिरात चंदन यात्रोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 11:33 PM