नाशिक : लोकमत समूहातर्फे आयोजित आणि राजुरी स्टील प्रस्तुत ‘नाशिक प्रीमिअर लीग’ अर्थात एनपीएल या क्रिकेट स्पर्धेत संदीप फाल्कन्स विरुद्ध एसव्हीसी रॉयल्स यांच्यात स्पर्धेतील चौथा सामना झाला. यात गतवर्षीचा उपविजेता संदीप फाल्कन्स या संघाने स्पर्धेत प्रथमच उतरलेल्या एसव्हीसी रॉयल्स या संघाला हरविले. संदीप फाल्कन्सचा हा या स्पर्धेतील सलग दुसरा विजय आहे.एसव्हीसी रॉयल्स या संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले. संदीप फाल्कन्स या संघाने २० षटकांत २०१ धावांचा डोंगर उभा केला. या धावसंख्येला सामोरे जाताना एसव्हीसी रॉयल्स या संघाने सर्व बाद १३४ धावा केल्याने त्यांना ६७ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. संदीप फाल्कन्सचा कर्णधार मनोज परदेशी याने काल रात्री मराठा वॉरियर्स विरुद्ध खेळताना नाबाद ५६ धावा केल्या होत्या; परंतु आज एसव्हीसी संघासमोर खेळताना तो १ धाव करून तंबूत परतला. त्याचप्रमाणे श्रीकांत शेरीकर हा काल नाबाद ९५ धावा करून सामनावीर झाला होता. तोही आज लवकर बाद झाला, असे कालच्या सामन्यातील दोन्हीही हीरो आज लवकर तंबूत परतल्याने संदीप फाल्कन्सची धावसंख्या ६ षटकांत ३ बाद ३६ अशी झाली होती. अशा परिस्थितीत दिनेश शिंदे व विराज ठाकूर यांनी संघाला मजबूत करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. दिनेश शिंदे हा २५ धावा करून बाद झाल्यानंतर मैदानात सौरभ देवरे आला. सौरभने फटकेबाजी करून दिशा बदलून टाकली. विराज ठाकूर व सौरभ देवरे यांनी यशस्वी भागीदारी करून संघाला भक्कम स्थितीत आणून ठेवले. गोलंदाजी करताना एसव्हीसीतर्फे वैभव केंदळे याने संदीप फाल्कन्सचा कर्णधार मनोज परदेशी याला बाद केले. गौरव काळे याने श्रीकांत शेरीकर याला बाद करून महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. मितेश जोंधळे व अमित लहामगे यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. एसव्हीसी या संघातर्फे फलंदाजी करताना नीलेश चव्हाण याने ३० चेंडूत ५८ धावा केल्या. यात त्याने ४ चौकार व ५ षटकार मारले. या स्पर्धेतील महागडा खेळाडू प्रशांत नाठे याने १३ चेंडूत २६ धावा केल्या. यात २ चौकार व २ षटकार त्याने मारले. या संघाचे अन्य खेळाडू टिकाव धरू न शकल्याने संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. या संघाने १७ षटकांत सर्व बाद १३४ धावांपर्यंत मजल मारली. संदीप फाल्कन्सतर्फे गोलंदाजी करताना तन्मय शिरोडे याने ४ षटकांत १४ धावा देत ४ गडी बाद केले. दिनेश शिंदे याने ४ षटकांत ३२ धावा देत ३ गडी बाद केले. अशा प्रकारे या दोन्ही डावखुऱ्या फिरकी गोलंदाजांनी एकूण ७ गडी बाद केले. विराज ठाकूर, शरद इंगळे व सागर लभडे यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. (प्रतिनिधी)
संदीप फाल्कन्सचा सलग दुसरा विजय
By admin | Published: December 23, 2014 11:46 PM