नाशिक : विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून राष्टÑवादी व कॉँग्रेस आघाडीच्या वतीने जिल्हा बॅँकेचे संचालक संदीप गुळवे यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याचे मानले जात आहे. नाशिक येथे शरद पवार यांच्या उपस्थितीत गुळवे यांनी राष्टÑवादीत प्रवेश केला व विशेष म्हणजे भुजबळ समर्थकांनीही गुळवे यांच्या नावाला हिरवा कंदील दर्शविल्यामुळे त्यासंदर्भातील हालचाली गतिमान झाल्याचे सांगण्यात आले आहे. विधान परिषदेसाठी मे महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, त्यादृष्टीने राजकीय पातळीवर घडामोडी सुरू झाल्या आहेत. सर्वाधिक सदस्यबळ असलेल्या भाजपात सुप्त पद्धतीने या निवडणुकीची व्यूहरचना केली जात असली तरी, त्यांना अद्यापही विधान परिषदेसाठी सेनेसोबत युती होण्याची अपेक्षा आहे. भाजपातदेखील अनेक इच्छुक असले तरी, उघडपणे त्याबाबतची चर्चा करण्यास कोणी धजावत नाही. दुसरीकडे शिवसेनेत उमेदवारीवरूनच बेबनाव होऊन प्रबळ दावेदार असलेले अॅड. शिवाजी सहाणे यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. सूत्रांच्या मते शिवसेनेने जिल्हा बॅँकेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक नरेंद्र दराडे यांचे नाव निश्चित झाले असून, फक्त अधिकृत घोषणा बाकी आहे. सेनेतून हकालपट्टी करण्यात आलेल्या सहाणे यांनी निवडणूक लढविण्यावर ठाम रहात सर्वपक्षीय पर्याय खुले ठेवले आहेत. त्यामुळे त्यांनी यापूर्वी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन ‘फिल्डिंग’ लावण्याचा प्रयत्न केला, परंतु भाजपाकडून सेनेतील बंडखोराला उमेदवारी देण्याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. कॉँग्रेस आघाडीकडून उमेदवाराचा शोध सुरू असताना शिवाजी सहाणे यांचे नाव घेतले जात असून, त्यांनीदेखील अनुकूलता दर्शविल्याचे सांगण्यात येत असतानाच आता संदीप गुळवे यांचे नाव घेतले जात आहे. गुळवे यांना राजकीय वारसा असून, सर्वपक्षीयांशी त्यांचे संबंध आहेत. शिवाय जिल्हा बॅँकेच्या माध्यमातून ते दराडे यांना टक्कर देऊ शकतील तसेच आघाडीच्या समविचारी पक्षांचादेखील गुळवे यांना विरोध असणे अशक्य मानले जात आहे. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी नाशिक भेटीवर आलेले राष्टÑवादीचे प्रभारी आमदार जयंत पाटील यांनी तसेच भुजबळ समर्थकांनीही गुळवे यांच्या नावाला अनुकूलता दर्शविली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीतच उमेदवारीसाठी चढाओढ लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आघाडीकडून संदीप गुळवेंचे नाव आघाडीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2018 1:53 AM