नाशिक: नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक आखाड्यात मंगळवारी (दि.११) नाट्यमय घडामोड घडली. एकूण चार उमेदवारांनी माघार घेतली. नावाशी साधर्म्य असलेले अपक्ष उमेदवार संदीप नामदेवराव गुळवे (पाटील) रा.कऱ्हे ता.संगमनेर (जि.अहमदनगर) तसेच किशोर प्रभाकर दराडे (कोकमठाण ता. कोपरगाव जि.अहमदनगर) यांनी नाट्यमयरित्या माघार घेतली. त्यामुळे एकमेकांना कात्रित पकडणाऱ्या महाविकास आघाडीसह महायुतीलाही हायसे झाले. माघारीसाठी बुधवारी (दि.१२) अखेरचा दिवस आहे, २६ जून रोजी मतदान होणार असून अंतिम मुदतीपर्यंत एकूण ५३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते.
यामध्ये ३८ अपक्ष, तर १५ पक्षीय उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यात सहा उमेदवारांना पक्षाने अधिकृत एबी फॉर्म दिले आहेत. आमदार किशोर दराडे यांनी शिंदे गटाकडून, तर संदीप गुळवे यांनी महाविकास आघाडीकडून अर्ज दाखल केला आहे. मात्र त्यांच्याच नावाशी साधर्म्य असलेल्या संदीप गुळवे अन् किशोर दराडे या अपक्षांनी माघार घेतल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. त्यासाठी दोघा पक्षांना बरीच खटाटोप करावी लागली.
बंडखोरांचे आव्हान संपुष्टात येणार काय?दिलीप पाटील यांनी काँग्रेसकडून, तर अजित पवार गटाकडून ॲड. महेंद्र भावसार यांनी अर्ज दाखल केला आहे. यामुळे महाआघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान उभे राहिले आहे. आता बुधवारी अखेरच्या दिवशी बंडखोरांना थोपविण्याचे आव्हान प्रमुख दोघा पक्षांसमोर असेल.
दराडे यांच्या अर्जानंतर झाले हाेते वादंगअपक्ष किशोर प्रभाकर दराडे यांनी अर्ज दाखल केला तेव्हा बरेच वादंग झाले हाेते. विभागीय आयुक्त कार्यालयात आपल्या उमेदवाराशी नाव सामर्थ्य असलेले दराडे अर्ज दाखल करण्यास आल्याचे समजल्यावर महायुतीच्या उमेदवारांनी त्यांना तेथून पिटाळून लावण्याचा प्रयत्न केला होता. दराडे दोन दिवस घरी पोहोचले नव्हते. त्यामुळे हाय हाल्टेज ड्रामा पहावयास मिळाला होता. अखेरीस किशोर दराडे अर्ज माघारीसाठी दाखल होताच मंगळवारी प्रकरण शांत झाले. मात्र हाच प्रत्यंतर विरोधी पक्षाच्या तंबुतही पहावयास मिळाला.अपक्ष संदीप नामदेवराव गुळवे यांनी माघार घेतल्याने महायुतीचे उमेदवार ॲड.संदीप गोपाळराव गुळवे (पाटील) यांना दिलासा मिळाला.