सिन्नर : तालुक्यातील पाटोळेच्या सरपंचपदी संगीता हंसराज आव्हाड, तर उपसरपंचपदी जिजा ज्ञानेश्वर खताळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
माजी सरपंच मेघराज आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली ग्रामविकास पॅनलने सात जागा मिळवून निवडणुकीत निर्विवाद वर्चस्व मिळविले होते. येथील ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी दिलीप पवार यांच्या अध्यक्षतेखाली निवडीसाठी विशेष बैठक पार पडली.
सरपंचपदासाठी संगीता आव्हाड यांच्या नावाची सूचना सुनील सांगळे यांनी मांडली, तर उपसरपंचपदासाठी जिजा खताळे यांच्या नावाची सूचना गीतांजली कराड यांनी मांडली. निर्धारित वेळेत दोन्ही पदांसाठी एक- एक अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा अध्यासी अधिकारी पवार यांनी केली.
बैठकीस मनोहर चकोर, गीतांजली कराड, मोहिनी खताळे, सुनील सांगळे, देवीदास कराड, मनीषा खताळे आदींची उपस्थिती होती. ग्रामस्थांतर्फे मेघराज आव्हाड यांनी नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा सत्कार केला.गत पाच वर्षांत गावात विविध विकासकामे मार्गी लावल्याने मतदारांनी ग्रामविकास पॅनलला बहुमत दिले आहे. नळ पाणीपुरवठा, जलसंधारण, पाणी फाउंडेशन, वृक्षलागवड आदी कामे झाल्याने पाण्याची पातळी वाढली. शासनाच्या विविध योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केला. त्यामुळे नागरिकांनी आम्हाला कामाची पावती दिली.-मेघराज आव्हाड, माजी सरपंच, पाटोळे