नाशिक: लोकसभा निवडणुकीसाठी नामानिर्देशनपत्र दाखल करण्याच्या अंतिम दिवशी शिवसेना ठाकरे गटाचे इच्छुक उमेदवार विजय करंजकर यांनी बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी दाखल केल्याने ठाकरे गटाच्या, तर सटाणा येथील माजी आमदार संजय चव्हाण यांनीही अपक्ष अर्ज दाखल केल्याने राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) अडचणी वाढल्या आहेत. शांतीगिरी महाराज यांनीही शिंदेसेनेचा एबी फॉर्म न आल्याने पुन्हा अपक्ष अर्ज दाखल करीत आपले आव्हान कायम ठेवले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात नाशिकमध्ये २० मे रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी नाशिक आणि दिंडोरीसाठी नामानिर्देशनपत्र दाखल करण्यास प्रारंभ झाला होता. शुक्रवार (दि. ३) रोजी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची गर्दी झाली होती. अधिकृत उमेदवारांनी गुरुवारी (दि.२) अर्ज दाखल केल्यानंतर शुक्रवारी अपक्ष आणि बंडखोर उमेदवार अर्ज दाखल करतील अशी अटकळ बांधली जात होती. त्यानुसार शिवसेना (ठाकरे गट) इच्छुक उमेदवार विजय करंजकर यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करून ठाकरे गटासमोरील अडचणी तूर्तास वाढवल्या आहेत.
दुसरीकडे शिंदेसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या शांतीगिरी महाराजांनी पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म न मिळाल्याने पुन्हा एकदा अपक्ष उमेदवारीचा अर्ज दाखल केला. काहीही झाले तरी आपण भक्तांच्या आग्रहाला मान देत निवडणूक लढवणारच असल्याचा दावा शांतीगिरी महाराजांनी केला. याशिवाय वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार करण गायकर यांच्यासह दिंडोरीतील वंचितच्या उमेदवार मालती थविल यांनीही आज पुन्हा अर्ज दाखल केला. याशिवाय शांतीगिरी महाराजांनीही शिंदेसेनेचा एबी फॉर्म न मिळाल्याने पुन्हा अपक्ष उमेदवारी दखल केली. याशिवाय सटाणा येथील माजी आमदार संजय कामतीलाल चव्हाण यांनीही दिंडोरी मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी दाखल केल्याने दिंडोरीतही राष्ट्रवादीसमोरच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. याशिवाय दिवसभरात विविध पक्षांसह सुमारे ३३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले.
पक्षाने दिलेला शब्द पाळला नाही...शिवसेना(ठाकरे गट) पक्षाने मला तीन मिहन्यांपूर्वी निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार मी जिल्ह्यात प्रचारही सुरू केला होता. मात्र, अचानक मला डावलण्यात आले. असे का झाले त्याचे कारणही मला सांगितले नाही. त्यामुळे मी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतल्याची माहिती विजय करंजकर यांनी दिली.
मी अद्यापही राष्ट्रवादी शरद पवार गटात आहे. केवळ कार्यकर्त्यांनी आग्रह केला म्हणून अर्ज दाखल केला आहे. पक्षातून ज्या सूचना येतील त्याचे मी पालक करणार असून कोणत्याही प्रकारची बंडखोरी करण्यासाठी मी अर्ज भरलेला नाही.- संजय चव्हाण (माजी आमदार)
...उद्या छाननीउमेदवारी दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर शनिवारी (दि.४) जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात सकाळी ११ पासून उमेदवारांची छाननी करण्यात येणार आहे. यासाठी उमेदवार, त्यांचे प्राधिकृत प्रतिनिधी यांना प्रवेश देण्यात येणार आहे. दोन्ही मतदारसंघांचे अधिकारी यावेळी निर्णय देणार आहेत.