दिनेश पाठक, नाशिक: महायुतीचा सुपडा पहिले लोकसभा अन् नंतर विधानसभा निवडणुकीत साफ हाेणार असून इंडिया आघाडीसह राज्यातील महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाही. लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाचा तिढा येत्या तीन ते चार दिवसात सुटेल. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना सोबत घेऊनच आम्ही निवडणुकीस सामोरे जाऊ, अशी माहिती उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी येथे रविवारी (दि.२१) सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
शिवसेनेचा अयोद्धा येथे राम मंदिरासाठीच्या लढ्यात काय सहभाग होता? याचे पुरावे आम्ही चित्र प्रर्दशनाच्या माध्यमातून नाशिक येथे मंगळवारी (दि.२३) होणाऱ्या अधिवेशनात देणार असल्याचे देखील राऊत यांनी सांगितले. उद्धव ठाकरे यांचा दोन दिवसीय दौरा तसेच महाअधिवेशनाच्या तयारीसाठी खासदार राऊत नाशिकमध्ये आले आहेत. एका हॉटेलमध्ये पत्रकार परिषद झाली. तेव्हा त्यांनी राज्यातील युतीचे सरकार घटनाबाह्य असल्याचा पुनरूच्चार केला.
ते म्हणाले की, अयोद्धेत प्रभू श्री रामाचे मंदिर झाल्याचा मनस्वी आनंद आहेच. यासाठी शिवसेनेचेही योगदान आहे. स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी मशिदीचा ढाचा पाडल्याची प्रथम जबाबदारी जाहीरपणे स्वीकारली होती. अन् सत्ताधारी लोक आमच्याकडे शिवसेनेचा अयोद्धेतील मंदिर आंदोलनात काय सहभाग म्हणून विचारतात. देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर भाजपेयींचे विधान बालिशपणाचे लक्षण आहे. आम्ही नाशिकमध्ये दोन दिवसांनी उद्धव ठाकरे यांच्या सभेत शिवसेनेचे त्या वेळचे कारसेवक व इतर कारसेवकांना सन्मानित करणार आहाेत. तसेच राज्य अधिवेशनच्या ठिकाणी शिवसेनेचा आतापर्यंतचा प्रवास तसेच राम मंदिराच्या लढ्यात प्रत्यक्ष सहभाग याचे जुने छायाचित्र मांडणार आहोत. त्यामुळे जनतेच्या दरबारात आंदोलनातील सहभागाचे आमचे पुरावे सादर करणार असून देवेंद्र फडणवीस यांचेसह भाजपाच्या इतर नेत्यांना पुरावे देण्याची गरज नसल्याचे देखील खासदार संजय राऊत यांनी ठासून सांगितले.
आमचा सोहळा बिगर राजकीय
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याहस्ते गोदाआरती, काळाराम मंदिरात दर्शन, भगूर येथे सावरकर स्मारकास भेट हे सर्व कार्यक्रम बिगर राजकीय आहेत. त्यामुळे आम्ही सर्वपक्षीय पदाधिकारी, नेते, नागरिक यांनाही आमंत्रित केले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना भाजपा सरकारने अयोद्धेतील साेहळ्याचे आमंत्रण न देता त्यांचा अवमान केला आहे. मात्र आम्ही त्यांना नाशिकच्या साेहळ्यासाठी आंमत्रित केले असल्याचे राऊत यांनी सांगितले. अयोद्धेतील सोहळा भाजपाने इव्हेंट केला असल्याचा पुनरूच्चार त्यांनी केला.
फडणवीसांचा फोटो नागपूरच्या स्टेशनवरील असावा
मी कारसेवक असल्याचा मला अभिमान असून अयोद्धेतील आंदोलनात शिवसेनेचा काय सहभाग? असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनेकदा सांगितले. फडणवीसांच्या या विधानानंतर विरोधकांकडून त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी कारसेवक असल्याचा फोटो शेअर करत विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे. त्यावर संजय राऊत यांनी फडणवीस यांचेवर शाब्दीक बाण साेडले. फडणवीस यांना शिवसेनेचा इतिहास माहीत नाही. फडणवीस यांनी शेअर केलेला ‘तो’ फोटो नागपूरच्या स्टेशनवरचा असावा, अशी शंका देखील खासदार राऊत यांनी घेतली.
राऊत यांची काही महत्वाची विधाने:-
- वन नेशन वन इलेक्शनसह इव्हीएमला आमचा विरोधच. हा एक फ्रॉड आहे.
- उद्योग क्षेत्रात उदय सामंत यांचे योगदान काय? ते लायक व्यक्ती नव्हे
- राम मंदिरासाठी भाजपाच्या जुन्या नेत्यांचे योगदान मान्य
- शिवसेनेच्या महाअधिवेशनात ‘दार उघड बया दार उघड’ हा नारा पुन्हा देणार
- महाअधिवेशनातून निवडणुकीच्या तयारीला लागणार