गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना १०० तोंडी रावण म्हटलं गेलं हे मलाही आवडलेलं नाही. पण त्यावर पंतप्रधानांनी जनतेसमोर अश्रू ढाळत हा गुजरातचा अपमान असल्याचं आवाहन जाहीर सभेत केलं. मग महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाजारांचा झालेला अपमान हा राज्याचा अपमान नाही का? असा सवाल उपस्थित करत खासदार संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला. ते नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
कर्नाटकनं सोडलेल्या पाण्यात मुख्यमंत्री अन् सरकारनं जलसमाधी घ्यावी; संजय राऊतांचा घणाघात
संजय राऊत सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. "गुजरातच्या प्रचारसभेत मोदी हे १०० तोंडाचे रावण आहेत असं काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले त्यावर रान उठवलं गेलं. देशाच्या पंतप्रधानांना असं रावण संबोधनं मलाही वैयक्तिक पातळीवर पटलेलं नाही. पण मोदींनी याच मुद्द्यावरुन जनतेसमोर अश्रू ढाळले आणि हा गुजरातचा अपमान असल्याचं म्हटलं. मोदींना रावण म्हटल्यावर राज्याचा अपमान होतो. मग छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्यावर महाराष्ट्राचा अपमान होत नाही का? म्हणजे मोदींचा झालेला अपमान भाजपाला दिसतो. पण शिवाजी महाराजांचा अपमान दिसत नाही. अशी ही दुटप्पी भूमिका भाजपा घेत आहे", असं संजय राऊत म्हणाले.
४० आमदार गेले तरी पक्ष तिथेच, कधीही निवडणूक घ्या!संजय राऊत यांनी यावेळी बंडखोर ४० आमदारांवरही निशाणा साधला. "गद्दारांपैकी कोण काय बोलतंय याचं मला काही पडलेलं नाही. ४० नेते गेले असले तरी पक्ष तिथंच आहे. पालापाचोळा उडून गेल्यानं शिवसेनेला फरक पडत नाही. तुम्ही कितीही खोके द्या. जनता खोक्याला विकली जात नाही हे लक्षात ठेवा. आज सत्ता असल्यानं तुमच्याकडे सुरक्षा व्यवस्था आहे. सुरक्षा काढून फिरा मग जनतेचा रोष लक्षात येईल. आम्ही बघा सुरक्षेविना बिनधास्तपणे फिरू शकतोय पण गद्दारांचं तसं नाही. त्यांना भिती आहे आणि जनतेच्या रोषाला तुम्ही थोपवू शकत नाही", असं संजय राऊत म्हणाले.
'गद्दार' हे त्यांच्या कपाळावर कोरलं गेलंय"ज्या पद्धतीनं दिवार सिनेमात अमिताभ बच्चनच्या हातावर 'मेरा बाप चोर है' कोरलं गेलं होतं. त्याचपद्धतीनं या गद्दारांच्या माथ्यावर गद्दारी कोरली गेली आहे. त्यांची बायका, पोरं आणि नातेवाईक यांच्या पिढ्यानपिढ्यांना गद्दारी लक्षात राहील. जनता कधीच काही विसरत नाही. तुम्ही आताही निवडणूक घ्या शिवसेनाच निवडून येईल", असंही राऊत म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"