नाशिक: गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि विरोधक भाजप यांच्यात अनेकविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यातच आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत नाशिक दौऱ्यावर आहेत. शिवसेना नगरसेवक डी. जी. सुर्यवंशी यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन संजय राऊत यांनी केले. यावेळी संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली. आम्ही करेक्ट कार्यक्रम केला, महाराष्ट्र दोन वर्षांपूर्वी स्वतंत्र झाला, या शब्दांत संजय राऊत यांनी हल्लाबोल केला आहे.
१९४७ मध्ये जसे आंदोलन झाले, 'चलेजाव'ची चळवळ झाली म्हणून ब्रिटिश सरकार पळाले. तसेच जनता रस्त्यावर आली असती कोण पंतप्रधान, कोण गृहमंत्री आहे हे जनतेने पाहिले नसते. त्यामुळेच कायदे मागे घेतल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. तसेच नाशिक महापालिकेत शिवसेनेचे १०० नगरसेवक निवडून येतील, असा विश्वास संजय राऊत यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
आम्ही करेक्ट कार्यक्रम केला
आम्ही करेक्ट कार्यक्रम करत महाराष्ट्राला दोन वर्षापूर्वी स्वतंत्र करत भगवा फडकवला, असे टोला संजय राऊत यांनी भाजपला लगावला आहे. शेतकरी मालक नव्हे गुलाम करण्याचा हा कायदा होता. शेतकऱ्यांच्या जमिनीवर कब्जा करणारा हा कायदा होता. गाड्या घातल्या गुंड पाठवले मात्र शेतकरी हटला नाही. दीड वर्षांपासून शेतकरी तणाव, दबावात होता त्या जोखडातून बाहेर निघाले, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला निर्णय दु:खद असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते. चंद्रकांत पाटील यांना दु:ख वाटत असेल, तर त्यांना शोक संदेश पाठवू, शोकसभा आयोजित करू असा चिमटा संजय राऊत यांनी काढला.