सटाणा : येथील बाजार समितीच्या सभापतिपदी भाजपचे संजय पंडित सोनवणे यांची गुरु वारी (दि.२७) बिनविरोध निवड करण्यात आली. बाजार समितीच्या इतिहासात प्रथमच सोनवणे यांच्या रूपाने पश्चिम आदिवासी पट्टयाला सभापतीपदाचा बहुमान मिळाला आहे.बाजार समितीचे कामकाज करतांना संचालकांना विश्वासात घेत नाही म्हणून मंगला प्रवीण सोनवणे यांच्यावर तेरा संचालकांनी अविश्वास आणून त्यांना गेल्या महिन्यात सभापतिपदावरून पायउतार केले होते. या रिक्त पदाच्या निवडीसाठी गुरु वारी येथील बाजार समितीच्या सभागृहात सहायक निबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी महेश भडांगे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची विशेष सभा बोलावण्यात आली. यावेळी सभापतिपदासाठी डांगसौंदाणे गणाचे संचालक व तुळजाभवानी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजय पंडित सोनवणे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. सोनवणे यांना संजय देवरे सूचक तर पंकज ठाकरे अनुमोदक होते. सोनवणे यांची बिनविरोध निवड झाल्याने त्यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला. सभापती सोनवणे यांचा सत्कार प्रभारी सभापती सरदारिसंग जाधव यांनी केला. याप्रसंगी संचालक मंडळ उपस्थित होते.
सटाणा बाजार समिती सभापतीपदी संजय सोनवणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 5:47 PM
बिनविरोध निवड : आदिवासी पट्टयाला प्रथमच बहुमान
ठळक मुद्दे मंगला प्रवीण सोनवणे यांच्यावर तेरा संचालकांनी अविश्वास आणून त्यांना गेल्या महिन्यात सभापतिपदावरून पायउतार केले होते