सिन्नर : कालबाह्य झालेल्या नायगावसह नऊ गावे पाणी योजनेला जिल्हा परिषदेकडून ४ कोटी ७३ लाख ९६ हजार ४९८ रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे योजनेला संजीवनी मिळाली आहे. पाच गावांतील वाड्या-वस्त्यांचाही नव्याने समावेश करण्यात आल्याने ४५ हजार लोकसंख्येला पाणी पुरवठ्याची क्षमता निर्माण झाली आहे. चार वाड्यांवर जलकुंभाची उभारणी होणार असून जलशुद्धीकरण केंद्रातील कालबाह्य यंत्रणाही हटवण्यात येणार आहे.आमदार राजाभाऊ वाजे, जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांच्या पाठपुराव्यातून योजनेला निधी उपलब्ध झाला. जिल्हा परिषद सदस्या सुनीता सानप, पंचायत समितीचे सभापती भगवान पथवे, गटनेते संग्राम कातकाडे यांनी कामाचा पाठपुरावा केला. पाच ते सात वर्षापूर्वीच कालबाह्य झालेल्या योजनेकडे तत्पूर्वीच निधी उपलब्ध होणे गरजेचे होते. तसे न झाल्याने योजना चालवण्यात विविध अडथळे आले. त्यातच जीवन प्राधिकरणाकडून योजना ताब्यात घेण्यासही लाभार्थी गावांनी नकार दिला. गावांपर्यंत न पोहोचणारे पाणी, अपुरा पाणी पुरवठा, योजनेला जागोजागी असलेली गळती आदी कारणांनी योजना अडखळत सुरु होती. प्राधिकरणाकडे निधी नसल्याने लाभार्थी गावांतील पाणी पुरवठा अडचणीत आला होता.मोहदरी, मोह, जायगाव, वडझिरे, देशवंडी या पाचही गावांना पुरेशा क्षमतेने पाणी देण्यासह संबंधित गावांतील सर्व वाड्या-वस्त्यांचा समावेश योजनेत करण्यात आला आहे. सुमारे ४५ हजार लोकांना पाणी पुरवठ्याची क्षमता यात असेल. जायगाव येथे पंप बसवून पाणी देशवंडी पर्यंत नेण्यासाठीची व्यवस्थाही नवीन कामात असेल.योजनेचे प्रत्येक गावात जलकुंभ आहेत. वस्त्यांचा समावेश झाल्याने वडझिरे येथील नगारा, सांगळे व देशवंडी येथील ठाकरवस्ती, दगड वस्तीवर जलकुंभ बांधण्यात येणार आहेत. पाचही गावांतील २० हून अधिक वस्त्यांवर पाणी पोहोचू शकेल. जलशुद्धीकरण केंद्रातील कालबाह्य यंत्रणा हटवण्यात येणार असून जल वाहिन्यांतील गळती दरूस्त करण्याबरोबर फुटलेले व्हॉल्व्हही टाकण्यात येणार आहेत. निधी उपलब्ध झाल्याने तालुक्याच्या उत्तर भागातील गावांतून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
नायगावसह पाच गावांतील वाड्या-वस्त्यांच्या योजनेला संजीवनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 5:55 PM