लोकमत न्यूज नेटवर्कदिंडोरी/लखमापूर : दिंडोरी तालुक्यात सुरू असलेल्या संततधारेमुुळे टमाटा पीक धोक्यात आले असून, त्यावर करपा, बुरशी रोगाचा प्रादुर्भाव दिसू लागला असून, फूलकळी कुजण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात टमाटा पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. यंदा कोरोनामुळे नर्सरीमध्ये बुकिंग करूनही टमाटा रोपे न मिळाल्याने बळीराजाला पीक घेण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली. मिळेल त्या ठिकाणाहून रोपे आणून नागपंचमीला बहुसंख्य शेतकऱ्यांनी टमाटा लागवड केली.नगदी पीक म्हणून टमाटा पिकाकडे पाहिले जाते. सुरुवातीच्या पावसावर शेतकरीवर्गाने महागडी रोपे आणून अर्ली टमाट्याची लागवड केली. पिकाची वाढ चांगल्याप्रकारे होत असतानाच पावसाने दडी मारली. याही अवस्थेत शेतकरीवर्गाने जिवाचे रान करीत पीक वाचविले. पीक ऐन बहरात असतानाच पावसाची रिपरिप सुरू झाली. सततच्या संततधार पावसाने अर्ली व नूतन लागवड केलेल्या टमाटा पिकावर संक्रांत आली. पिकावर करपा, बुरशी रोगाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात दिसून येत असल्यामुळे शेतकरीवर्गात चिंता व्यक्त होत आहे. लहान टमाटा पिकाला बुरशी रोगाने विळखा दिल्याने झाडांची वाढ खुंटली आहे. तसेच अर्ली म्हणजे नागपंचमीला लागवड केलेल्या झाडांची वाढ चांगल्या प्रकारे होत असली तरी झाडांवर रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. झाडांना लागलेल्या फूलकळीत पावसाचे पाणी साचून कळी कुजण्याच्या प्रमाणात वाढ झाली असून, फूलकळी गळून पडत आहे. सध्या काही शेतकऱ्यांनी टमाटा बाजारपेठेत विक्रीसाठी आणला आहे. आवक कमी असल्यामुळे दरही चांगला मिळत आहे. परंतु रोगाच्या प्रादुर्भावामुळे फळधारणेवर परिणाम झाला असून, शेतकरीवर्गाची आशेची निराशा होण्याचे चित्र दिसत आहे.संततधार पावसामुळे पीक वाचविण्यासाठी शेतकरी महागड्या औषधांची फवारणी करीत आहे. परंतु पावसाचा मारा सुरू असल्याने फवारणी केलेले औषध पाण्याने धुऊन जात असल्याने शेतकरीवर्गाची डोकेदुखी वाढली आहे. शेतशिवारात चिखल असल्याने शेतात वाहने जात नाही. सर्व कामे बळीराजा स्वत:च्या ताकदीच्या आधारे करीत आहे. पिकांचे नुकसानसतत होणारा पावसामुळे करपा, बुरशी आदी रोगांचा प्रादुर्भाव वाढला, अर्ली टमाट्याच्या झाडांना लागलेल्या फूलकळीत पावसाचे पाणी साचून कळी कुजण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. लहान रोपांवर बुरशी व आळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने पीक वाचवण्यासाठी शेतकरीवर्गाला तारेवरची कसरत करावी लागत आहे.सध्या टमाटा पिकाकडे सर्व लक्ष केंद्रित केले आहे. मात्र पिकावर करपा, व्हायरस, बुरशीचाप्रादुर्भाव तसेच फूलकळी कुजण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे उपन्नवाढीवर मोठ्या प्रमाणात परिणाम होण्याची भीती आहे.- संदीप मोगल,टमाटा उत्पादक, लखमापूर
पावसामुळे टमाट्यावर संक्रांत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 11:04 PM
दिंडोरी/लखमापूर : दिंडोरी तालुक्यात सुरू असलेल्या संततधारेमुुळे टमाटा पीक धोक्यात आले असून, त्यावर करपा, बुरशी रोगाचा प्रादुर्भाव दिसू लागला असून, फूलकळी कुजण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
ठळक मुद्देबळीराजा हवालदिल : करपा, बुरशी रोगाचा प्रादुर्भाव; फूलकळी कुजण्याच्या प्रमाणात वाढ