त्र्यंबकेश्वर : पौष वद्य एकादशीला संत निवृत्तीनाथ महाराज यात्रा होत असते. यंदा कोविडचे संकट असल्याने यात्रेकरूंविनाच ही यात्रा सुरू झाली असून सोमवारी महापूजेनंतर यात्रेचा समारोप होणार आहे. या वर्षी दोन एकादशी असल्याने निवृत्तीनाथ संजीवन समाधीच्या दोन महापूजा होणार आहेत. रविवारी (दि. ७) षट्तीला व सोमवारी (दि. ८) स्मार्त एकादशी असल्याने वारकरी सांप्रदायात या दोन्हीही एकादशींचे विशेष महत्त्व असते. रविवारी रात्री ११ ते २ पर्यंत रांगेतील जो पहिला मानकरी असेल त्या वारक-याच्या हस्ते सपत्नीक महापूजा करण्याचा मान देण्याचे प्रशासकीय समितीच्या सदस्यांनी ठरवले आहे.(पान २ वर)दूरवरून पायी दिंडीने चालत आलेल्या भाविक वारक-यांना मंदिरापासून २०० मीटर्स अंतरावर थांबविण्यात येत असून ज्यांच्याकडे देवस्थानचा पास असेल त्यांना आत प्रवेश देण्यात येत होता. अन्यथा २०० मीटर्स अंतरावर बॅरिकेडिंग केल्याने तेथूनच भाविकांना निवृत्तीनाथ मंदिर कळसाचे दर्शन करून माघारी पाठविले जात आहे.यासाठी त्र्यंबकेश्वर येथे नव्यानेच रुजू झालेले प्रशिक्षणार्थी सहायक जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी शुभम गुप्ता यांच्या आदेशाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवृत्तीनाथ मंदिराकडे जाणा-या तीन प्रमुख रस्त्यावर बॅरिकेडिंग लावून भाविकांना थोपविण्यात आले आहे. तेथूनच दर्शन करून भाविकांना परत पाठविले जात आहे. निवृत्तीनाथ मंदिर परिसर ब्रम्हगिरी पायथा, गंगाद्वार पायथा, त्र्यंबकेश्वर बस स्थानक, कुशावर्त तीर्थ परिसर, नील पर्वत पायथा, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौक, त्र्यंबकेश्वर मंदिरासमोर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. गर्दी करून घोळक्याने राहू नये, यासाठी ही संचारबंदी सोमवारी (दि. ८) मध्यरात्रीपर्यंत लागू करण्यात आली आहे. प्रशासकीय समितीतील सरकारी अधिकारी धर्मादाय आयुक्त कार्यालयातील सहा. धर्मादाय आयुक्त के. एम. सोनवणे, मुख्याधिकारी संजय जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे आदींसह प्रभारी तहसीलदार रामकिसन राठोड हे परिस्थितीची पाहणी करून काळजी घेत आहेत.दरवर्षी शासकीय महापूजा संपल्यानंतर प्रथम रांगेतील भाविकाच्या हस्ते सपत्नीक पूजा करण्याची परंपरा होती. पण यावर्षी शासकीय महापूजेला फाटा देत वारक-याच्याच हस्ते महापूजा होणार आहे. सोमवारी (दि. ८) भागवत एकादशीनिमित्त त्र्यंबक नगर परिषदेचे नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, उपनगराध्यक्ष सागर उजे या दोघांच्या हस्ते संत निवृत्तीनाथ संजीवन समाधीची सपत्नीक महापूजा केली जाणार आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रयोग आहे.
संत निवृत्तिनाथ यात्रेला यात्रेकरूंविना प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2021 1:36 AM