जायखेडा : साठ वर्षांची अखंड परंपरा असलेला बागलाण तालुक्यातील श्रीक्षेत्र जायखेडा येथील संतभेट सोहळा वै. कृष्णाजी माउलींच्या स्मारक मंदिरात दिवाळीच्या मुहूर्तावर भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्यासाठी नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यांतील वारकरी भाविकांसह महाराष्ट्रातील विविध भागातील हजारो भाविक संतनगरीत दाखल झाले होते. कृष्णाजी माउलींच्या महानिर्वाणानंतरही दरवर्षी जायखेडा येथे त्यांनी सुरू केलेल्या संतमीलन सोहळ्याची पताका तितक्याच दिमाखाने त्यांच्या भक्तांनी फडकवत ठेवली आहे. यावेळी माउलींचा भक्तपरिवार व कृष्णाई प्रतिष्ठानकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. श्रीक्षेत्र जायखेडा येथे संपन्न झालेल्या संतदर्शन सोहळ्याची सांगता मधुसूदन महाराज गेवराई (बीडकर) यांच्या कीर्तनाने करण्यात आली. यावेळी त्यांनी जगद्गुरू संत तुकोबारायांच्या ‘दसरा दिवाळी तोचि आम्हां सण ! सखे हरि जन भेटतील !! अमुप जोडिल्या पुण्याचिया राशी ! पार त्या सुखासी नाही लेखा !! धन्य दिवस आजी झाला सोनियाचा! पिकली हे वाचा रामनामे !! तुका म्हणे काय होऊ उतराई! जीव ठेवू पायी संताचिये !!’ या अभंगातून या सोहळ्याचे माहात्म्य मांडले. यावेळी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, जि. प. सदस्य यतिन पगार, भाऊसाहेब कापडणीस. शांतिसागर जयरामबाबा गोंडेगावकर, तुकाराम महाराज गोराणेकर, विश्वनाथ महाराज तळवाडेकर, आचार्य हरिभाऊ तळवाडे दिगर, भटाअण्णा काळगावकर, आचार्य भाऊसाहेबशास्त्री नांदिनकर, एकनाथ महाराज नामपूरकर, दीनानाथ सावंत टेंभेकर, नामदेव महाराज नांदिनकर, श्रावण महाराज, सुदाम महाराज, विठोबा महाराज अंतापूरकर आदिंसह महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य, कीर्तनकार व मृदंगाचार्य, भजनी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. सोहळ्याच्या नियोजनासाठी कृष्णाई प्रतिष्ठानचे प्रमुुख धनंजय महाजन लोहोणेरकर व माउली भक्तांनी विशेष परिश्रम घेतले. (वार्ताहर)
जायखेडा येथे संतभेट सोहळा
By admin | Published: November 05, 2016 1:03 AM