त्र्यंबकेश्वर : श्रीक्षेत्र पंढरपूर येथे आषाढी एकादशी निमित्त गेलेल्या त्र्यंबकेश्वर येथील संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखीचे शुक्रवारी (दि.२) आपल्या स्वगृही आगमन झाले. यावेळी भाविकांनी पालखीचे जोरदार स्वागत केले.दि. १८जुन रोजी पालखीने त्र्यंबकेश्वरहून प्रस्थान ठेवले होते. पंढरपुर वारी आटोपल्यानंतर चार दिवस पंढरपुर क्षेत्री पालखी रथाचा मुक्काम होता. दि.१६ जुलै रोजी पालखीचा परतीचा प्रवास सुरु होउन शुक्रवारी (दि.२) दुपारी १.३० वाजता पालखी आपल्या समाधी मंदिरात विसावली. त्र्यंबकेश्वरहून जातांना पालखीचा प्रवास २४ दिवसांचे होता. या वेळी प्रत्येक गावात कीर्तन-प्रवचन करतांना ही दिंडी हरीत वारी तथा निर्मल वारी उपक्र म साजरे करीत आली आहे. प्रत्येक गावकऱ्याने किमान २५ झाडे निवृत्तीरायांच्या नावाने लावावीत.जो वारकरी असेल त्यांनीही आपल्या जागेत पाच झाडे लावावीत. आपला परिसर स्वच्छ ठेवावा. गाव हगणदारी मुक्त करा, असा संदेश पालखीने दिला. दरम्यान, परतीच्या प्रवासात पालखी केवळ १७ दिवसात स्वगृही परतली. पालखी समवेत समाधी संस्थानचे अध्यक्ष हभप पंडीत महाराज कोल्हे, पालखी प्रमुख पुंडलिकराव थेटे, हभप संजय महाराज धोंडगे, त्र्यंबकराव गायकवाड, दिंडीचे मानकरी हभप मनोहर महाराज बेलापुरकर, हभप बाळकृष्ण महाराज डावरे कोनांबेकर आदी सहभागी झाले होते.
संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ पालखी स्वगृही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2019 6:48 PM
त्र्यंबकेश्वरी आगमन : निर्मल वारीचा दिला संदेश
ठळक मुद्दे प्रत्येक गावात कीर्तन-प्रवचन करतांना ही दिंडी हरीत वारी तथा निर्मल वारी उपक्र म साजरे करीत आली