कळवण : आद्य स्वयंभू शक्तिपीठ श्रीक्षेत्र सप्तशृंगगडावरील सप्तशृंगी या आदिमायेचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक-भक्त सह्याद्रीची पर्वतरांग सर करीत श्रीक्षेत्र सप्तशृंगगड येथे अनवाणी पायाने येत आहेत. गरीब भाविक, भक्तगणांच्या आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी सप्तशृंगनिवासनी देवी ट्रस्टने गडावर ‘माणुसकीची भिंत’ उभारली आहे. या भिंतीतून आता माणुसकीचा झरा पाझरू लागला आहे.सेवाभावी उपक्र मातून न्यासाच्या व्यवस्थापनाने विधायक निर्णय घेतला. नाशिक जिल्हा व सत्र न्यायाधीश अरुण ढवळे यांच्या शुभहस्ते भिंतीची विधिवत पूजा करण्यात आली. नाशिकच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती यू. एम. नंदेश्वर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच विश्वस्त डॉ. रावसाहेब शिंदे, राजेंद्र सूर्यवंशी, माजी विश्वस्त वसंतराव देशमुख, मुख्य व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत या उपक्रमास सुरुवात करण्यात आली.सधन भाविकांनी त्यांच्या नको असलेल्या वस्तू व साहित्य या माणुसकीच्या भिंतीवर अर्पण केल्या तर त्याचवेळेस गरजूंनी ते साहित्य स्वीकारले. एखाद्या भिंतीला माणुसकीचा पाझर फुटावा आणि त्यातून मानवी सेवेचा झरा निर्माण व्हावा ही कल्पना संत ज्ञानेश्वरांच्या वैश्विक प्रार्थना अर्थात पसायदानातील ओळीप्रमाणे प्रभावी असल्याचे मत जिल्हा व सत्र न्यायाधीश अरुण ढवळे यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी भरत नेरकर, भिकन वाबळे आदि उपस्थित होते. (वार्ताहर)
सप्तशृंगगडावर माणुसकीच्या भिंतीतून पाझरला झरा
By admin | Published: April 07, 2017 11:37 PM