नाशिक : सार्वजनिक वाचनालय, नाशिक या संस्थेतर्फे दरवर्षी देण्यात येणारा कार्यक्षम आमदार पुरस्कार यावर्षी शिवसेनेच्या आमदार नीलम गोऱ्हे यांना जाहीर झाल्याची माहिती सार्वजनिक वाचनालयाचे काळजीवाहू अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर यांनी दिली.सार्वजनिक वाचनालयाच्या निवडणुका झाल्यानंतर एप्रिल महिन्यात या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. स्मृतिचिन्ह, पन्नास हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. कार्यक्षम आमदार पुरस्कारासाठी निवड करण्यात येणाऱ्या समितीत सावानाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर, कार्यवाह कर्नल आनंद देशपांडे, आमदार प्रतिनिधी हेमंत टक ले, शैलेंद्र तनपुरे आदिंचा समावेश आहे. माजी आमदार आणि पत्रकार माधवराव लिमये यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या कन्या डॉ. शोभा नेर्लीकर आणि डॉ. विनायक नेर्लीकर यांनी सार्वजनिक वाचनालयाला दिलेल्या देणगीच्या व्याजातून हा पुरस्कार देण्यात येतो. महानगरपालिकेची निवडणूक आणि विधानसभेचे अधिवेशन तसेच आता सुरू असलेल्या सार्वजनिक वाचनालयाची निवडणूक यामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याचे औरंगाबादकर यांनी सांगितले. सन २००३ पासून सुरू करण्यात आलेल्या या उपक्र मात आतापर्यंत बी. टी. देशमुख, गणपतराव देशमुख, आर. आर. पाटील, प्रमोद नवलकर, शोभा फडणवीस, जीवा पांडू गावित, दत्ताजी नलावडे, गिरीश पाटील, भाऊसाहेब फुंडकर, जयंत पाटील, देवेंद्र फडणवीस, बाळासाहेब थोरात आणि बच्चू कडू यांना सन्मानित करण्यात आले आहे.
नीलम गोऱ्हे यांना सावानाचा कार्यक्षम आमदार पुरस्कार
By admin | Published: March 25, 2017 12:50 AM