कळवण : ‘..वारी वारी जन्मा मरणा ते वारी, हारी पडलो आता संकट ने वारी’ याप्रमाणेच कावडधारक वारीने आज सप्तशृंगगडावर पोहोचले. देशभरातील पवित्र नद्यांच्या जलाने व पुरोहितांच्या मंत्रोच्चारात भगवतीला जलाभिषेक करण्यात आला. दोन लाखाहून अधिक कावडधारकांचा हा सोहळा साठविण्यासाठी अडीच लाखांहून अधिक देवीभक्त व भाविक सप्तंशृगगडावर देवीचरणी नतमस्तक झाले.कोजागरी उत्सवासाठी महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेशातून हजारो देवीभक्त पायी गडावर येतात. नांदुरी मुक्कामी पोहोचलेला कावडधारकांचा जथा सकाळपासूनच सप्तशृंगगडाकडे कूच करत होता. कावडधारकांना सायंकाळनंतर सोडण्यात येणार असल्यामुळे इतर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. मुळा, मुठा, नर्मदा, गोदावरी, तापी, गंगा, यमुना, शिप्रा, गिरणा, मोसम आदी पवित्र नद्यांचे जल घेऊन लाखाच्या आसपास कावडधारकांनी सप्तशृंगीचा जल्लोष केला. विश्वस्त डॉ. रावसाहेब शिंदे व राजेंद्र सूर्यवंशी तसेच मुन्ना रावल यांच्या हस्ते जलाभिषेक करण्यात आला. कावडधारकांमध्ये त्र्यंबकेश्वर, नाशिक, असलोद, तळोदा, शहादा, नंदुरबार, इंदूर, उज्जैन, पुणे, भीमाशंकर, सिन्नर, नगर, निफाड, प्रकाशा , कासारे येथील भाविकांचा समावेश होता. उपविभागीय महसूल अधिकारी अर्जुन श्रीनिवास, तहसीलदार कैलास चावडे, पोलीस निरीक्षक सुजय घाटगे यांच्यासह सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, भिकन वाबळ, भरत नेरकर, संदीप बेनके पाटील, गिरीश गवळी, राजेश गवळी यांनी नवरात्रोत्सवात सहकार्य केले. रात्री ९ वाजता देवीची वेदोक्त मंत्रोपचारात कावडीद्वारे आणलेल्या पवित्र तीर्थाने अभिषेक करण्यात आला.पदयात्रेला श्याम दिनकर जाधव यांचे सहकार्य लाभले. पदयात्रा यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष धर्मा शिंदे, सचिव उद्धव पाटील, दिलीप राजभोज, भटू पाठक, जगदीश पाटील प्रयत्नशील होते.
सप्तशृंगगड : किन्नरांची कोजागरीनिमित्त मिरवणूक; कावडधारकांची गर्दी लाखो भाविक नतमस्तक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2017 11:50 PM