मनोज देवरे कळवणसप्तशृंगगडाला पाणीपुरवठा करणाऱ्या भवानी पाझर तलावाची लघु पाटबंधारे विभागाच्या पथकाने पाहणी केली असून, लवकरच पाझर तलावाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव तयार करून तलावाची उंची वाढविणे व गळती थांबविण्याचे काम मार्गी लावण्यात येणार आहे. यामुळे नागरिक व भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. तलाव दुरुस्तीसाठी ४ कोटी रु पये निधी उपलब्ध करून देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आश्वासन दिले आहे, अशी माहिती उपसरपंच गिरीश गवळी यांनी दिली.सप्तशृंग गडावर वर्षातून नवरात्री व चैत्रोत्सव अशी दोन वेळेस यात्रा भरते. देशभरातून लाखो भाविक वर्षभरात गडावर देवीच्या दर्शनासाठी हजेरी लावतात. सप्तशृंग गडाला पाणीपुरवठा करणाऱ्या भवानी तलावाने अवघ्या पाच महिन्यांतच तळ गाठण्यास सुरुवात केल्याने उन्हाळ्यापूर्वीच गडावर पाणीटंचाई निर्माण होऊ लागली आहे. सप्तशृंगगड व सप्तशृंगी देवी ट्रस्ट यांना लागणाऱ्या पिण्याच्या व वापराच्या पाण्यासाठी भवानी तलावातील पाणी वापरले जाते; मात्र, या तलावाला गळती लागल्याने ३० ते ३५ टक्के पाणी वाया जाते. तसेच, तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साठला आहे. गडावर पाण्याची तीव्र टंचाई भासत असल्याने ग्रामस्थ, हॉटेल व्यावसायिकांना दरवर्षी ग्रामपंचायत व ट्रस्ट टँकरद्वारे नांदुरी येथील पाझर तलाव व परिसरातील शेतकऱ्यांच्या खासगी विहिरींवरून पाणी विकत आणावे लागते. परिणामी, व्यावसायिकांसह ग्रामपंचायत व ट्रस्टला पाणी वाहून आणण्यासाठी आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो.गडावर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. मात्र, पावसाचे पाणी वाहून जाते. याबाबत ग्रामपंचायत व न्यासाने पाटबंधारे विभागाकडे भवानी पाझर तलावाची उंची वाढवून तलावाची गळती थांबविण्यासाठी वेळोवेळी पत्रव्यवहार केला. तसेच ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे भवानी तलावाचा प्रश्न कायमचा मार्गी लावण्याची मागणी केली आहे. त्यादृष्टीने लघु पाटबंधारे पूर्व विभाग नाशिकचे उपअभियंता आर. बी. धूम, शाखा अभियंता के. एस. सोनवणे, पी. आर गुंजाळ यांच्या पथकाने पाझर तलावाची पाहणी केली. तलावाची उंची व गळती थांबविण्याच्या कामाचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात येणार आहे. यावेळी उपसरपंच गिरीश गवळी, ग्रामपंचायत सदस्य राजेश गवळी, गणेश बर्डे, लिपिक विजय वाघ, सुरेश मोहिते, नरेंद्र मुगदल आदि उपस्थित होते.
सप्तशृंगगडाचा पाणीप्रश्न सुटणार
By admin | Published: February 20, 2016 9:41 PM