कळवण : सप्तशृंगगड ग्रामपंचायत येथे जिल्हा परिषदेच्या जिल्हा वार्षिक योजना २०१६-१७ अंतर्गत तयार करण्यात आलेल्या २ कि. वॉट सौर वीजनिर्मिती सयंत्राचे उद्घाटन ग्रामपंचायत सदस्य राजेश गवळी यांच्या हस्ते करण्यात आले.सौर वीजनिर्मितीचे सयंत्र बसविणारी तालुक्यात सप्तशृंगगड ग्रामपंचायत पहिली तर जिल्ह्यात दुसरी ठरली आहे. ऊर्जा मंत्रालय नवी दिल्ली यांच्या तांत्रिक गुणवत्ता व मापदंडानुसार जिल्ह्यातील ४४ गावांना सौर वीजनिर्मिती २ कि. वॉट सयंत्र युनिट मंजूर करण्यात आले आहे. यात कळवण तालुक्यातील सप्तशृंगगड, लिंगामे, तिºहळ खुर्द, जुनी बेज, मानूर, नांदुरी आदी सहा ग्रामपंचायतींचा समावेश आहे. तालुक्यात सप्तशृंगगड ग्रामपंचायतीने आपला २५ हजारांचा सहभाग भरून सयंत्र बसविले आहे. सौर वीजनिर्मिती सयंत्र बसविणारी सप्तशृंगगड ग्रामपंचायत तालुक्यात पहिली व जिल्ह्यात दुसरी ग्रामपंचायत ठरली आहे. जिल्ह्यात सर्वप्रथम तळेगाव ग्रामपंचायतीने हे युनिट बसवून कार्यान्वित केले आहे. या यंत्रामुळे ग्रामपंचायत कार्यालयात विजेचा लखलखाट होऊन ग्रामपंचायत कार्यालय वीजबिल मुक्त झाले आहे. या संयंत्राचे उद्घाटन ग्रामपंचायत सदस्य राजेश गवळी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य गणेश बर्डे, शांताराम सिद्गर, मुरलीधर गायकवाड, राहुल बेनके, ईश्वर कदम, दीपक जोरवर, मयूर जोशी, किरण कदम, राजू गांगुर्डे, प्रकाश कवडे, अजय बेंडकुळे, किरण गवळी आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
सप्तशृंगगड ग्रामस्थांमध्ये समाधान : ग्रामपंचायत कार्यालय वीजबिल मुक्त सौर वीजनिर्मिती सयंत्र कार्यान्वित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 1:12 AM