कळवण (नाशिक) - साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या सप्तश्रृंगी देवीच्या चैत्रोत्सवास भक्तिभावाने प्रारंभ झाला. आदिशक्ती श्री सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी बोल अंबे की जयच्या जयघोष करीत लाखो देवीभक्त व भाविक महाराष्ट्राच्या विविध भागांतून सप्तशृंगगडाकडे मार्गक्रमण करीत आहेत.खान्देशातून देवी दर्शनासाठी आसुसलेले पाय मजल दरमजल करीत सप्तशृंग गडाकडे निघाल्याने जळगाव, धुळे, मालेगाव, सटाणा, कळवण, नांदुरी रस्त्यावरील पदयात्रेमुळे सप्तशृंगगडावर जाणारे रस्ते भाविकांच्या गर्दीने अक्षरश: फुलू लागले आहेत. या देवीभक्तांच्या सेवेसाठी ठिकठिकाणी गणेश मंडळे व कार्यकर्ते सरसावले आहे. आज महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून हजारो देवीभक्तांनी सप्तशृंग मातेच्या चरणी लीन होऊन दर्शन घेत आपली इच्छा प्रकट करून आशीर्वाद मागितला.ऐन चैत्रातील रणरणत्या जवळपास 40 अंश डिग्री तापमानाच्या कडक उन्हात विविध वयोगटातील स्त्री-पुरुष, अबालवृद्ध कसलीही पर्वा न करता उन्हाच्या झळा अंगावर घेत सप्तशृंग गडाकडे मार्गक्रमण करताना दिसून येत आहेत. शासन, प्रशासनाने व सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट, ग्रामपंचायत यांनी भाविकांना सर्व सुविधा देण्यासाठी नियोजन केले आहे.
सप्तश्रृंगी देवीच्या चैत्रोत्सवास भक्तिभावाने प्रारंभ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2018 3:12 PM