नाशिक : घरफोड्यांच्या गुन्ह्यातील मुद्देमालाच्या चौकशीसाठी शहरातील पंचवटीतून तेलंगाणामधील सायबराबाद पोलिसांच्या पथकाने सराफ व्यावसायिक विजय बिरारी (४७) यांना सोमवारी ताब्यात घेतले होते. दरम्यान, शासकीय विश्रामगृहातील शिवनेरी इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडून बिरारी यांचा मंगळवारी (दि.२५) मृत्यू झाला. यामुळे सायबराबाद पोलिसांची चौकशी संशयाच्या भोवऱ्यात सापडली. सायबराबाद पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी शहरातील व्यावसायिकांनी बुधवारी (दि.२६) कडकडीत बंद पाळून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.सायबराबाद पोलीस आयुक्तालयातील विविध गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मुख्य तपासी पथकाने घरफोडीतील संशयित आरोपी प्रकाश शिंदे याच्या कबुली जबाबावरून बिरारी यांना सोमवारी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. सायबराबाद पोलिसांच्या या कारवाईबाबत कुठल्याही प्रकारची लेखी माहिती स्थानिक पोलिसांना देण्यात आली नसल्याचे उपायुक्त अमोल तांबे यांनी सांगितले.पथकाने संशयावरून चौकशीसाठी (बेस्ड कस्टडी) बिरारी व त्यांच्या दुकानातील दोघा कारागिरांना ताब्यात घेतले होते. चौकशी सुरू असताना अचानकपणे बिरारी हे विश्रामगृहाच्या चौथ्या मजल्यावरून कोसळून ठार झाल्याची घटना मंगळवारी घडली. यानंतर शहरात एकच खळबळ उडाली अन् सराफी व्यावसायिकांमध्ये संतापाची लाट पसरली. दरम्यान, सायबराबाद पोलिसांच्या कारवाईच्या निषेधार्थ नाशिक सराफ असोसिएशनकडून बुधवारी शहरासह जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास सराफ व्यावसायिकांनी अचानकपणे सराफ बाजारातून जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘आक्रोश’ मोर्चा काढला. या मोर्चात मोठ्या संख्येने सराफ व्यावसायिक सहभागी झाले होते.मोर्चा सराफ बाजार, दहीपूल, धुमाळ पॉइंट, रेडक्रॉस सिग्नल, एम.जी.रोडवरून मेहेर सिग्नलमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी मोर्चेक-यांनी ‘तेलंगाणा पोलीस हाय-हाय.., नाशिक पोलीस हाय-हाय..., तेलंगाणा पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे..., पंचवटी पोलिसांवर कारवाई करा, बिरारींना न्याय द्या... अशा घोषणा देत लक्ष वेधून घेतले. यावेळी मोर्चेक-यांनी काळ्या फिती लावल्या होत्या. मोर्चेकरी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर येताच सुरक्षारक्षकांकडून मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले आणि ताबा पोलिसांनी घेतल्याने मोर्चेकरी अधिकच संतप्त झाले. यावेळी मोर्चेक-यांनी जोरदार घोषणा देत तेलंगाणा पोलिसांसह पंचवटी पोलिसांचाही निषेध नोंदविला. दरम्यान, सराफ व्यावसायिकांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिका-यांची भेट घेत कारवाईचे निवेदन सादर केले.