लोकमत न्यूज नेटवर्क
पेठ : गुजरात राष्ट्रीय महामार्गावरील कोटंबी घाटात मोटरसायकल स्वारास मारहाण करून वाहनासह भ्रमणध्वनी व दागिने लुटणाऱ्या संशयितास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या मदतीने पकडण्यात पोलिसांना यश आले असून याच टोळीकडून अजून अनेक गुन्ह्यांची उकल झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि. २२ मे रोजी रात्री १० वाजेदरम्यान तालुक्यातील बेहेडमाळ येथील रहिवासी असलेले सोमनाथ गंगाराम जाधव हे गावाकडे परतत असताना ३ अज्ञात व्यक्तींनी त्यांना मोटर सायकलला धक्का देऊन पाडले. हातातील दंडुक्याने फटके देऊन जबर जखमी करून त्यांची मोटरसायकल , गळ्यातील सोन्याचे पान व मोबाईल घेऊन पलायन केले. मारहाणीत जखमी झालेले जाधव यांना रस्त्यावरून पेठकडे येणाऱ्या वाहनाने ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याची खबर पोलिसांना प्राप्त झाली नसल्याने सदर गुन्ह्याची नोंद दि. २५ मे रोजी करण्यात आली . वरवर साधारण वाटणाऱ्या या घटनेचा मागोवा घेण्यासाठी पोलिसांनी जिल्हा यंत्रणेकडे मदत मागितली. मोबाईल ट्रॅकिंगचा आधार घेऊन तपासाची दिशा ठरवत असता सदरचे गुन्ह्यातील सूत्रधार चोरलेली मोटर सायकल विक्रीसाठी उमराळे ता. दिंडोरी येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली. कोचरगावच्या दिशेकडून येणारी मोटरसायकल अडवून संशयिताकडे गाडीची कागदपत्रे, लायसन्सची मागणी केली असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. यावेळी भगवान पांडुरंग टोंगारे यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले असता एका पाठोपाठ लुटीच्या घटनांची कबुली टोंगारे याने दिली. आता त्याचे दोन साथीदारही पोलिसांच्या रडारवर आहेत.
इन्फो
गुन्ह्यांची व्याप्ती मोठी
टोळीने यापूर्वी नाशिक - पेठ मार्गावरील ट्रक चालकांनाही लुटलेले असल्याची कबुली दिली. या प्रकरणाचा प्रारंभी तपास पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे पाटील यांचे मार्गदर्शना खाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप वसावे करीत असताना टोळीची व्याप्ती मोठी असल्याची खातरजमा झाल्याने तसा अहवाल वरिष्ठांना देण्यात आला आहे. भगवान टोंगारे यास अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यास ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी मिळाली असून सदर प्रकरणी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.