नाशिक : महापालिकेच्या सन २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी सादर झालेल्या आयुक्तांच्या अंदाजपत्रकात ११५ कोटींची भर घालत स्थायी समितीने अंदाजपत्रकाची पुस्तिका छपाईसाठी रवाना केली; परंतु भाजपाच्याच एका नगरसेवकाने पुस्तिकेत स्वातंत्र्यवीर सावरकरांचे छायाचित्र टाकण्याचे पत्र दिल्याने लेखा विभागाची पंचाईत झाली. त्यामुळे पुस्तिकेची छपाई काही काळ थांबविण्यात आल्याने पुस्तिकांचे वाटप बुधवारीही (दि.२८) नगरसेवकांपर्यंत होऊ शकले नाही. सावरकरांच्या छायाचित्राचे विस्मरण झाल्याने सत्ताधारी भाजपात मात्र चलबिचल सुरू झाली. अखेर सत्ताधारी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी महासभेच्या पुस्तिकेत सावरकरांचे छायाचित्र समाविष्ट केले जाणार असल्याचे सांगत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. महापालिकेचे सन २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी १७८५.१४ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक आयुक्तांनी स्थायी समितीला सुपूर्द केल्यानंतर स्थायी समितीने त्यात ११५ कोटी रुपयांची भर घालत पुस्तिकेच्या छपाईसाठी ते लेखा विभागाकडे पाठविले. मंगळवारी (दि.२७) रात्री उशिरापर्यंत अंदाजपत्रकात समाविष्ट करण्यात येणाºया कामांच्या याद्यांबाबत खल सुरू होता. त्यानंतर स्थायीचा ठराव रवाना करण्यात आला. येत्या ३१ मार्चला महासभेची विशेष अंदाजपत्रकीय सभा बोलावण्यात आली असून, त्यापूर्वी अंदाजपत्रकाच्या प्रती किमान दोन दिवस अगोदर १२७ नगरसेवकांच्या हाती पडणे आवश्यक आहे. त्यानुसार लेखा विभागाने महासभेवर सादर होणारे स्थायी समितीचे अंदाजपत्रक छपाईसाठी रवाना केले. त्यानुसार छपाई विभागाकडून त्याची छपाईही सुरू करण्यात आली. तत्पूर्वी दि. २६ मार्च रोजी भाजपाचेच नगरसेवक योगेश हिरे यांनी स्थायी समिती सभापतीला पत्र देत अंदाज पत्रकाच्या पुस्तिकेत स्वातंत्र्यवीर सावरकरांचेही छायाचित्र समाविष्ट करण्याची मागणी केली. मात्र, स्थायीकडून सदर पत्र लेखा विभागाला बुधवारी (दि.२८) दुपारी प्राप्त झाले तेव्हा अंदाजपत्रक छपाईसाठी रवाना करण्यात आले होते. भाजपाच्याच नगरसेवकाने सावरकरांच्या छायाचित्राचा समावेश करण्याचे पत्र दोन दिवसांपूर्वी देऊनही स्थायीच्या अंदाजपत्रकात त्याचा समावेश न झाल्याची बाब भाजपा पदाधिकाºयांच्या लक्षात आल्यानंतर सत्ताधाºयांत चलबिचल सुरू झाली. विरोधकांकडून या छायाचित्राबाबत भांडवल केले जाण्याच्या भीतीने पदाधिकाºयांची पाचावर धारण बसली. लेखा विभागाने अंदाजपत्रकाची छपाई काही काळ थांबवत छायाचित्राच्या समावेशाबाबत नगरसचिव विभागाकडे अभिप्राय पाठविला. परंतु, महासभेतच याबाबत निर्णय अपेक्षित असल्याचे सांगत नगरसचिव विभागानेही हात वर केले. त्यामुळे भाजपा पदाधिकाºयांची चांगलीच पंचाईत झाली. अखेर महासभेच्या अंदाजपत्रकात सावरकरांच्या छायाचित्राचा समावेश करण्यात येत असल्याचे सांगत सारवासारव करण्याचा प्रयत्न झाला. दरम्यान, सायंकाळी छपाई पुन्हा सुरू करण्यात आली. गुरुवारी (दि.२९) दुपारपर्यंत छपाई पूर्ण झाल्यानंतर त्याचे नगरसेवकांना वाटप केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.वादाची परंपरा कायममहापालिकेच्या अंदाजपत्रकाच्या पुस्तिकेत छायाचित्रांचा समावेश करण्यावरून यापूर्वी अनेकदा वाद झाले आहेत. सत्ताधारी बदलले की अंदाजपत्रकातील नेत्यांची छायाचित्रे बदलण्यात येतात. मागील वर्षीच्या अंदाजपत्रकात मनसेचे राज ठाकरे यांचे छायाचित्र छोटे टाकण्यात आल्याबद्दल आक्षेप घेण्यात आला होता. आजवर अंदाजपत्रकात प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशिवाय कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या छायाचित्राचाही समावेश करण्यात आला. महापुरुषांच्या छायाचित्रानंतर राष्टÑपती, पंतप्रधानांसह राजकीय नेत्यांची छायाचित्रे टाकली जातात.
भाजपाची सावरकरांच्या छायाचित्रावरून सारवासारव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 1:24 AM