देवळाली कॅम्प : कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या रुग्णालयात दोन डॉक्टरांच्या मानधनावरील नियुक्तीसह डॉक्टर कक्ष वाढविण्यास मंजुरी देण्यात आली. देवळालीकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न बनलेल्या स्मशानभूमीसाठी नवा प्रस्ताव तयार करण्यात येऊन त्यास बोर्डात मंजुरी देण्यात आली.कॅन्टोन्मेंट बोर्डाची सर्वसाधारण सभा अध्यक्ष ब्रिगेडियर पी. रमेश यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून देवळालीकरांचे लक्ष लागून असलेल्या या बैठकीत विविध विषयांवर निर्णय घेण्यात आले. प्रशासनाकडे सध्या उपलब्ध असलेले अधिकारी व कर्मचारी लोकसंख्येच्या दृष्टीने अपुरे पडत आहे. याबाबत बोर्डाने २०१२ मध्ये रिस्ट्रक्चर तयार केले असून, त्यानुसार भरतीप्रक्रिया राबविणे आवश्यक आहे. सध्या ठेकेदारी पद्धतीचा अवलंब होत असल्याने कामाची जबाबदारी निश्चित करता येत नाही. त्यासाठी कायमस्वरूपी कर्मचारी वर्ग असणे आवश्यक आहे.देवळालीची लोकसंख्या पन्नास हजाराच्यावर असून, कॅन्टोन्मेंट हद्दीत केवळ दोनच स्मशानभूमी आहे. त्यात देवळालीची स्मशानभूमी अडचणीची ठरत असल्याने देवळालीकरांना संसरीकरांवर अवलंबून राहावे लागत आहे. बैठकीत सर्वच नगरसेवकांनी आग्रहाची भूमिका घेत वॉर्ड क्र. ५ मध्ये स्टेंचिंग ग्राउंडवर असणाऱ्या ७२ एकर जागेपैकी २ एकर जागेवर नवी स्मशानभूमी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी काही सरकारी निधी व खासगी दानशूर व्यक्तीची मदत घेत सर्व सुविधांनीयुक्त असा हा प्रकल्प मार्गी लावण्यात येणार आहे. यासाठी रेल्वे विभागाची लागणारी परवानगीदेखील घेण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात आला असल्याचे नगरसेवक सचिन ठाकरे यांनी सांगितले. लाल पुलापासून काही अंतरावर ६ बाय ४ मीटरचा नवा बोगदा तयार करण्याबरोबरच या खालील थेट स्ट्रेचिंग ग्राउंडला जाणाºया मार्गाला जोडण्यात येणार आहे. शहरात लावण्यात येणाºया विविध प्रकारचे होर्डिंग्ज व जाहिरात फलकांच्या दरवाढीबाबत नगरसेवकांनी विरोध करत मागील धोरणाप्रमाणे कार्यवाही करून रक्कम वसुलीबाबत कडक धोरण अवलंबावे असे सूचित केले. बैठकीस उपाध्यक्ष मीना करंजकर, नगरसेवक प्रभावती धिवरे, सचिन ठाकरे, भगवान कटारिया, आशा गोडसे, दिनकर आढाव, कावेरी कासार, बाबूराव मोजाड, कर्नल राहुल मिश्रा, कर्नल कमलेश चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार आदी उपस्थित होते.दिवाळीनंतर पे अॅण्ड पार्क सुरू होणारशहरातील ढासळत असलेली वाहतूक व्यवस्था लक्षात घेता गेल्या महिन्यात बोर्ड प्रशासनाकडून नागरिकांचा होत असलेला विरोध टाळून सुरू करण्यात आलेल्या पे अँड पार्कबाबत बोर्डात वादळी चर्चा झाली. प्रशासनाने लोकप्रतिनिधी, नागरिक व व्यापारी यांना विश्वासात न घेता पे अँड पार्क सुरू केले होते; मात्र योग्य नियोजन करण्यात न आल्याने या निर्णयाला व्यापाºयांसह नागरिकांनी विरोध केला होता. आता पे अँड पार्क दिवाळीनंतरच सुरू केले जाईल यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
नवीन स्मशानभूमी बांधकाम करण्यास सर्वानुमती मंजूरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 1:15 AM