सिन्नर : शेतकऱ्यांवर कधी आणि कसे संकट येईल हे सांगता येत नाही. याची प्रचिती मनेगाव येथील शेतकºयाला आली. पाच वर्षे मेहनत घेऊन फुलविलेल्या केशर आंब्याचे पीक तोडणीला आल्यानंतर रात्रीतून अज्ञात चोरट्यांनी बागेवर डल्ला मारल्याची घटना घडली. चोरट्यांनी ९८० झाडांचे आंब्याचे फळ चोरुन नेल्याने शेतकºयाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सिन्नर तालुक्यातील मनेगाव येथील कचरु शिवाजी सोनवणे यांनी गावापासून दोन किलोमीटर अंतरावर पाटोळे शिवारात सुमारे अडीच हेक्टर जागेवर केशर आंब्याची २०१३ साली लागवड केली. पाच वर्षे काबाडकष्ट करुन ठिंबक सिंचनाद्वारे पाणी देऊन केशर बाग फुलवली. यावर्षी ९८० झाडांना केशर आंबा चांगलाच लगडला होता. आदल्या दिवशी सायंकाळी सोनवणे यांनी बागेत फेरफटका मारला होता. काल सकाळी मुलगा बागेत गेल्यानंतर त्यास कैºया व पालापाचोळा पडलेला दिसला. संशय आल्याने त्याने बागेत फेरफटका मारला. त्यावेळी त्यास झाडाला लागले फळ मोठ्या प्रमाणात चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. सोनवणे यांनी पाच वर्षे अतिशय कष्ट घेऊन केशर आंब्याची बाग फुलवली होती. मात्र चोरट्यांनी रात्रीतून आलेले फळ चोरुन नेल्याने सोनवणे यांच्यावर संकट कोसळले आहे. सोनवणे यांनी याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात चोरीची फिर्याद दिली. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार आर. व्ही. भागवत अधिक तपास करीत आहेत.
केशर आंब्याच्या बागेवर चोरट्यांचा डल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 2:18 PM