पंचवटी धार्मिक क्षेत्र म्हणून जगभर प्रसिद्ध आहे. पंचवटीला पौराणिक महत्त्व असल्याने जास्तीत जास्त नागरिकांनी एकत्रित यावे याच हेतूने १९२५ रोजी सरदार चौक मित्रमंडळाच्या वतीने गणेशोत्सव स्थापनेला सुरुवात करण्यात आली. त्यावेळचे युवा नेतृत्व तत्कालीन स्वातंत्र्य सैनिक सदूभाऊ भोरे, भीमाशंकर अदयप्रभू, शंकरनाना भोरे, परशराम महंकाळे, शंकरराव गुंडे आदी मंडळींनी पुढाकार घेत सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी मंडळ सुरू केले. सुरुवातीला सध्याच्या सरदार चौक पोलीस चौकीच्या जागी गणेशमूर्ती प्रतिष्ठापना करून उत्सव सुरू केला. त्यावेळी लोकनाट्य, पौराणिक देखावे साकारून नागरिकांना एकत्रितपणे आणण्याचा प्रयत्न केला. मंडळाचे यंदा गणेशोत्सव स्थापनेचे ९३ वे वर्ष आहे. पंचवटी परिसराला पौराणिक महत्त्व असल्याने आतापर्यंत धार्मिक देखावे सादरीकरण केले आहे. मंडळातर्फे गणेशोत्सव व महाराष्ट्र दिन असे वर्षातून दोनवेळा रक्तदान शिबिर राबविले जाते. याशिवाय मोफत आरोग्य तपासणी, विविध धार्मिक कार्यक्र म राबविले जातात.दरवर्षी खंबाळे येथील अनाथ बालक आश्रमातील विद्यार्थ्यांना गणवेश व शालेय साहित्य वाटप केले जाते. गणेशोत्सव वर्गणीतून जमा झालेल्या रकमेपैकी ५० टक्के रक्कम गणेशोत्सवाला, ३० टक्के रक्कम सामाजिक उपक्रम तर उरलेल्या रकमेतून पूरग्रस्त नागरिकांना मदत म्हणून वापरली जाते. अलीकडे (कै.) रमेशशेठ भोरे व (कै.) संजय अदयप्रभू यांनी या मंडळाचे नेतृत्व केले. सध्या मंडळाचे कामकाज मन्नासेठ अदयप्रभू, सुनील महंकाळे, राजेंद्र भोरे, राजेश भोरे, महेश महंकाळे, राजूसेठ अदयप्रभू, बंटी भोरे, रवींद्र अदयप्रभू, चिंटू भोरे, अमित भोरे, गणेश भोरे आदी बघत आहेत.
सेवाभाव जपणारे सरदार चौक मित्रमंडळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 1:28 AM